आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूरतेची हद्द; पत्नीचा गळा आवळला, मग गळ्यावर पाय देत ती मृत झाल्याची केली खात्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज-मोबाइल काढून घेण्यावरून वाद झाला. त्यात संतापलेल्या पतीने आधी पत्नीचा गळा आवळला. मग दोन मिनिटे तिच्या गळ्यावर पाय देऊन उभा राहिला. ती मृत झाल्याची खात्री करून घेतली आणि वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाची कबुली देण्यासाठी दाखल झाला. रांजणगाव येथे २० जुलै रोजी सकाळी हा प्रकार घडला. आरोपी आनंद सुरेश लोखंडेला अटक करण्यात आली आहे. 

 

घटनेविषयी पोलिसांनी माहिती दिली. ती अशी : रिक्षाचालक आनंदचे रांजणगाव, मुकुंदवाडी येथे स्वतःचे घर आहे. तो मागील ८ वर्षांपासून मुकुंदवाडी येथे पत्नी ममता, मुलगी प्रज्ञा (६) व मुलगा संघर्ष (३) यांच्यासह राहत होता. दरम्यान, घरासमोरच राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत ममताचे प्रेमसंबंध जुळले. तिने ८ जुलै रोजी दोन्ही मुलांसह पळ काढला होता. आनंदने ११ जुलै रोजी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात पत्नी दोन मुलांसह बेपत्ता झाल्याची नोंद केली. 

 

पत्नीला परत आणले 
दरम्यान, तक्रार नोंदवल्याच्या दिवशीच पत्नी मालेगाव (जि. नाशिक) येथे रेल्वेस्थानकावर असल्याची माहिती त्याला मिळाली. तो नातेवाइकांसह तेथे पोहोचला. तेव्हा पत्नीसोबत तो अल्पवयीन मुलगाही होता. समजूत काढल्यावर तिने परतण्याची तयारी दाखवली. मग सर्वजण एका हॉटेलात जेवण्यासाठी गेले. तेव्हा पत्नी आणि त्या मुलामध्ये खुणवाखुणवी तसेच पायाने एक-दुसऱ्यांना छेडणे सुरू असल्याचे आनंदच्या लक्षात आले. मग आनंदने मुलाला मारहाण केली. मुलगा पळून गेला. पत्नीला मागील गोष्टींचा विसर पडावा म्हणून आनंदने आई-वडिलांकडे म्हणजे रांजणगावात राहण्याचे ठरवले. 

 

ती निपचित पडली 
ममताच्या हातात कायम मोबाइल होता. त्यावरून १९ जुलै रोजी त्यांच्यात भांडण झाले. आनंदच्या आईने मिटवले. २० जुलै रोजी आनंदची आई शशिकलाबाई आनंदच्या दोन मुलांना अंगणवाडीत सोडण्यास गेली, तर वडील अंगणात बसले होते. ममताच्या हातात आनंदला पुन्हा मोबाइल दिसला आणि त्यांच्यात वाद पेटला. प्रचंड संतापलेल्या आनंदने ममताचा गळा दाबला. ती निपचित खाली पडल्यानंतर तिच्या मृत्यूची खात्री करून घेण्यासाठी २ मिनिटे तिच्या गळ्यावर पाय देऊन उभा राहिला. ठाण्यात पोहोचल्यावर त्याने पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्यासमोर गुन्ह्याची कबुली दिली. फौजदार विठ्ठल चासकर यांनी घटनास्थळी जाऊन खात्री करून घेतली. 

गुन्ह्याची कबुली देण्यासाठी स्वत:च पोलिस ठाण्यात दाखल 
पवन नगर रांजणगाव येथील खुनाची घटना घडल्यानंतर घटनास्थळाला पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड फौजदार विठ्ठल चासकर व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. 

 

आजीजवळ चांगले राहा 
तासाभरानंतर आनंदचे आई-वडील मुलांना घेऊन ठाण्यात आले. तेव्हा तुम्ही रडायचे नाही, आजीजवळ चांगले राहायचे, असे आनंद मुलांना सांगत होता.