आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवऱ्याने विहिरीत ढकलले, आज अनेकींचा आधार; कायद्याचे शिक्षण घेऊन आपल्याप्रमाणे इतर महिलांवर तशी वेळ येऊन नये यासाठी ती उभी आहे...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका पिढीचे आयुष्य अन्यायाच्या चिखलात गेले, इतर महिलांचे जाऊ नये यासाठी झटणाऱ्या रुबिना...

दीप्ती राऊत

नाशिक - दारुडा बाप, मारझोड करणारा नवरा हा अनुभव नागपूरच्या रुबिना पटेल यांनाही चुकला नाही. सधन, शिक्षित कुटुंबात वाढूनही हे त्यांच्या वाट्याला आले. नवऱ्याने एकदा विहिरीतच ढकलले. पण त्यातून बाहेर अाली ती वेगळीच रुबिना. अन्याय सहन करणार नाही या निश्चयाने पेटलेली.नवऱ्याच्या मारहाणीविरोधात आवाज उठवणाऱ्या रुबिनाला तिहेरी तलाकचा फटका बसला. पण ती थांबली नाही. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने दिलेल्या निकालाविरोधात तिने थेट न्यायालयाची दारे ठोठावली आणि धर्मसत्तेआडून महिलांवर होणाऱ्या कौटुंबिक अत्याचारांचे विश्व तिच्यासमोर अाले. ‘माझ्या केसच्या निमित्ताने मला मुस्लिम महिलांच्या परिस्थितीची खरी कल्पना आली', रुबिना सांगतात. त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. त्यांनी स्वत:च्या खटल्याचा स्वत:च युक्तिवाद सुरू केला. खरे तर अन्याय झाला होता रुबिनावर, पण दोन खटल्यात त्याच आरोपी होत्या. स्वत:च्या मुलाला भेटण्यास मज्जाव करण्यात आला होता. स्वत:ची केस लढत असतानाच इतर महिलांचे प्रश्न त्यांच्यासमोर अाले. त्यांनी स्वत:पलीकडे विचार करत रुबी सोशल वेल्फेअर संस्थेची स्थापना केली. आज रुबिना सोशल वेल्फेअर संस्था महिलांवरील अत्याचार आणि सांप्रदायिक हिंसेविरोधात लढणाऱ्या शेकडो महिलांचे बळ बनल्या आहेत. कुटुंबातील हिंसेविरोधात सुरू झालेला रुबिनाचा संघर्ष लवकरच धर्मांध हिंसेविरोधात पोहोचला. पोटासाठी कमावणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी बुरखा झुगारला. त्या सांगतात,‘बुरखा सोडला आणि मला स्वत:च्या अस्तित्वाची ओळख पटली.' इतरांसाठी लढणाऱ्या नवीन रुबिनाचा जन्म झाला होता. स्वत:चे निर्णय स्वत: घेणे सक्षमीकरणाच्या दिशेने पहिले पाऊल असते हे त्यांना पटले. त्यांनी एमएसडब्ल्यू, एमए केले.मुस्लिम महिलांना मागदर्शन

रुबी सोशल वेल्फेअर संस्थेतर्फे रुबिना पटेल यांनी मुस्लिम महिलांचे मोठे संघटन उभे केले. कौटुंबिक हिंसाचाराविरोधात त्यांना आत्मविश्वासाने उभे केले. कायदेशीर मार्गदर्शन दिले. रोजगाराची कौशल्ये पेरून आर्थिक स्वावलंबन शिकवले. सध्या संस्थेने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींवर लक्ष केंद्रित केले आहे. रुबिना म्हणतात, आमच्या पिढीचे आयुष्य तर या हिंसाचाराच्या आणि अन्यायाच्या चिखलात गेले, पुढील पिढीतरी यापासून दूर राहावी हेच त्यांचं स्वप्न आहे.