आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पती वियोगाचे दु:ख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादेत स्थायिक व्हायचा निर्णय घेतला तेव्हापासून मुलांच्या शाळा प्रवेशाची तयारी झाली होती. पती बालाजीला जाणार म्हणून आनंदाने त्यांची बॅग भरून दिली. त्यांना गाडीत बसवून दिले. भावी आयुष्याची आखणी चालू असतानाच अचानक पतीने जगाचा निरोप घेतला. एक हसतं-खेळतं कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झालं. आता यापुढील आयुष्यात अंधारच पसरलेला दिसून येतो की काय? असं वाटायला लागलं. आपल्या मुलांना धीर कसा द्यायचा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी आतून पार कोसळून गेले होते, स्वत:ला सावरणार कशी? अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ त्या काळात उठलेले होते. ज्यांच्याकडून धीर मिळेल, आधार मिळेल असे वाटत असते, ती अपेक्षाही फोल ठरली. पाप-पुण्य, नीती-अनीती, चारित्र्य, रूढी-परंपरा, समाज या सगळ्यांनी अडथळे निर्माण केलेले असतात. स्वत:ला सावरून मुलांसाठी का होईना, अर्धवट आयुष्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला तर समाज हवं तसे जगू देईल याचीही खात्री वाटत नव्हती. तरी घरातील सर्वांचा मान राखत, कोणाला वाईट वाटणार नाही, याचीही काळजी घेतली. मला तेव्हा असे वाटू लागले, आयुष्य म्हणजे एक अज्ञान यात्रा आहे. भाग्योदयासाठी नव्या आयुष्याचा प्रवास सुरू केला; परंतु शेवट भाग्यात होतेच असे नाही.

विवाहप्रसंगी उपस्थित लोक मंगलाक्षता डोक्यावर टाकून शुभाशीर्वाद देतात. त्यांचे आशीर्वाद पतीच्या निधनसमयी फलद्रूप झाले नाहीत. असे का व्हावे, असे विचारले असता उत्तर मिळते, तुझे नशीब! आयुष्याचा खडतर प्रवास चालूच ठेवत, मुलांच्या जीवनात सुखाचे दिवस आणले. त्यांना जिद्दीने शिकवले; पण पतीची उणीव कायम भासतेच. संपूर्ण जग जिंकले तरी ती भरून येणार नाही. शेवटी मनाची समजूत घातली, फुलाने अपेक्षा केली का कधी काट्याकडून आधाराची? धरतीने वाट पाहिली का आभाळाकडून सावलीची! किना-याला वाटली का भीती कधी समुद्राच्या लाटेची? लढाई आहे, जीवनाची; फक्त आपल्यालाच जिंकायची!