हैदराबाद एन्काउंटर / निवृत्त न्यायाधीशांमार्फत हैदराबाद एन्काउंटरची चौकशी; तेलंगण कोर्टात 3 याचिकांची सुनावणी

सीपी सज्जनार यांची मानव हक्क आयोगापुढे जबानी

प्रतिनिधी

Dec 12,2019 08:44:00 AM IST

हैदराबाद : तेलंगण पोलिसांच्या ताब्यात असलेल्या बलात्कार आणि हत्येतील चार संशयित आरोपींच्या एन्काउंटरप्रकरणी निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले. यासाठी नाव सुचवण्याचे आदेश सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी तेलंगण सरकारला दिले. चौकशी करणारे हे निवृत्त न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयातीच असावेत, अशी अट त्यांनी घातली आहे. दरम्यान, या संदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकांचीही सुनावणी गुरुवारी होईल. पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी मानवी हक्क आयोगापुढे अहवाल सादर केला. या प्रकरणी चार आरोपींचे सायबराबाद पोलिसांनी एन्काउंटर केल्याने देशभर त्याचे पडसाद उमटले. या कारवाईविरुद्ध तेलंगणा उच्च न्यायालयासोबतच सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल झाल्या होत्या. त्याच्या सुनावणीत दिल्लीस्थित निवृत्त न्यायाधीशांकरवी चौकशी करण्याचे आदेश सरन्यायाधीश बोबडे यांनी बुधवारी दिले. अॅड. मुकुल रोहतगी यांनी तेलंगणा सरकारच्या वतीने यावेळी बाजू मांडली. ही चौकशी न्यायालयाने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायधीशांद्वारेच व्हावी, ते सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश असावेत, असे आदेश देऊन सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा सरकारला ही नावे सूचवण्यास सांगितले आहे. गुरुवारी न्यायालय ही नावे जाहीर करणार आहे.


तेलंगणा एन्काउंटरप्रकरणी सुरू असलेल्या चौकशा, याचिका


१. याचिका क्रमांक १७३ - हैदराबादमधील महिला संघटनांच्या पत्राद्वारे उच्च न्यायालयाने दाखल याचिका.
२. याचिका क्रमांक १७६ - अॅड. व्यंकन्ना यांची ठार आरोपींच्या कुटुंबियांच्या वतीने दाखल याचिका.
३. याचिका क्रमांक १८९ - मानवी हक्क कार्यकर्ते रामा मेलकोट यांनी दाखल केलेली याचिका.
४. एसआयटी - तेलंगणा सरकारने राचकोंडा पोलिस आयुक्त महेश भागवत यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केलेले विशेष तपास पथक.

आज काय होणार?


तेलंगण उच्च न्यायालयात दाखल तीन याचिकांवर सुनावणी गांधी रुग्णालयात ठेवलेले मृतदेह कुटुंबीयांना मिळण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालय चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांचे नाव जाहीर करणार

X
COMMENT