आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद मुक्ती संग्राम दिन विशेष : प्रसिद्धीपराङ्मुख योद्धे : आ. कृ. वाघमारे; पत्रकारितेच्या माध्यमातून निझामाशी लढण्याचे काम केले अविरत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद मुक्तिसंग्राम म्हणजे धगधगते अग्निकुंडच. निझामाच्या जुलमी राजवटीतून हैदराबाद मुक्त करण्यासाठी अनेक शूरवीरांनी उभे आयुष्य या अग्निकुंडात झोकून दिले. अत्यंंत संघर्षपूर्ण अशा या संग्रामानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोेजी मुक्तीची पहाट उगवली. मात्र, मुक्तिसंग्रामात जिवाचे रान करणारे अनेक नायक प्रसिद्धीच्या पडद्याआड राहिले. त्यापैकीच एक त्यागी, तपस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे आनंद  कृष्ण वाघमारे म्हणजेच आ. कृ. वाघमारे. पत्रकारासोबत झुंजार स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांचा नावलौकिक राहिला.  १६ मार्च १९०१ रोजी जन्मलेले आ. कृ. वाघमारे यांचे कार्यक्षेत्र मराठवाडा होेते. ते ध्येयवादी पत्रकार होते. तसेच संघटनाकुशल कार्यकर्तेही होते. ‘मराठवाडा’ प्रकाशनापूर्वी त्यांनी हैदराबादहून मराठीत प्रसिद्ध होणाऱ्या “निझाम विजय’ या साप्ताहिकाचे १९३५ ते ३७ अशी तीन वर्षे संपादन केले. निझाम विजय नाव असले तरी त्यातून निझामी राजवटीची निंदा करण्याचे काम वाघमारे करत होते. त्यानंतर त्यांनी हैदराबाद संस्थानात वृत्तपत्र काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वृत्तपत्र काढण्यासाठी थेट मंत्रिमंडळाची परवानगी घ्यावी लागे. ती मिळतच नसल्यामुळे १० फेब्रुवारी १९३८ रोजी पुण्याहून साप्ताहिक मराठवाडा सुरू केला. या साप्ताहिकाने मराठवाड्याच्या वैचारिक जीवनात एक नवीन कालखंड सुरू झाला. २-३ अंक प्रसिद्ध हाेताच निझामांची त्यावर नजर पडली आणि ते बंद  करण्यात आले. मात्र, वाघमारे दादांनी बंदी हुकुमातील नाव वगळून दरवेळी नवनवीन नावांनी मराठवाडा सुरू ठेवला. एका वर्षात मराठवाडा, नागरिक, संग्राम, समरभूमी, हैदराबाद  स्वराज्य, मोगलाई, कायदेभंग, कायाकल्प, संजीवनी अशा ११ नावांनी तो वर्षभर सुरू ठेवला. ही बाब निझामांंच्या लक्षात आल्यावर त्यांच्यावर राष्ट्रद्राेहाचा खटला भरण्यात आला. त्यांची मालमत्ता जप्त करून दीड वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.   सांस्कृतिक दडपशाहीचे वस्त्रहरण मराठवाडा वृत्तपत्रातील धारदार लिखाणाने वाघमारे यांनी निझामांच्या जुलमी राजवटीला केवळ अस्वस्थच केले नाही तर त्यास प्रचंड हादरेही दिले. निझामी राजवटीतील सांस्कृतिक दडपशाहीचे वस्त्रहरण करताना त्यांनी परिश्रमपूर्वक जमा केलेली आकडेवारी वापरून “हैदराबाद संस्थानातील लोकस्थिती’ ही ६२ पानांची पुस्तिका प्रकाशित केली. भाषा आणि संस्कृती हे माणसाच्या जीवनाचे अविभाज्य भाग असल्याचे ते जाणून होते. म्हणूनच सरकारी निर्बंध न जुमानता औरंगाबादमध्ये बळवंत वाचनालय सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. संस्थानात मराठीला डावलून उर्दू संस्थांना पैशांची खिरापत वाटणाऱ्या निझामी राजवटीवर वेळोवेळी टीका केली.  

पहिल्या अंकातच निधन वार्ता
अर्धसाप्ताहिक मराठवाडा दैनिक म्हणून १५ ऑगस्ट १९६८ रोजी सुरू झाले. याच्या एक दिवस आधी १४ ऑगस्ट १९६८ रोजी वाघमारे यांचा मृत्यू झाला. मराठवाडा दैनिकाच्या पहिल्या अंकाची मुख्य बातमी वाघमारे यांच्या निधनाची होती.
 

महाराष्ट्र संघाची स्थापना
जबाबदार राज्य पद्धती या मागणीच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर १९३६ मध्ये त्यांनी महाराष्ट्र संघ या संस्थेची स्थापना केली. उस्मानाबाद  जिल्ह्यातील हिप्परगा येथील अनंतकाका कुलकर्णी त्यांचे सहायक  होते. कुलकर्णी यांनी राष्ट्रीय शाळेची स्थापना केली होती. येथे स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे शिक्षक म्हणून कार्यरत होते. येथून वाघमारे यांच्या कार्यास उभारी आली. महाराष्ट्र संघाच्या पुढाकारानेच हैदराबाद संस्थानातील मराठवाडा विभागासाठी महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशन भरवण्यात आले. १९३७ ते १९४६ दरम्यान भरलेल्या ६ अधिवेशनांच्या आयोजनात आ.कृं. चा मोठा वाटा होता. परिषदेचे १९४३ सालचे अधिवेशन औरंगाबाद येथे झाले. त्यावेळी महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद हे राष्ट्रीय नेते बंदिवासात होते. स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी ब्रिटिशांचे प्रयत्न सुरू होते. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन भरत होते. वाघमारे याचे स्वागताध्यक्ष होते. १९४६ मध्ये लातूर येथेही अधिवेशन झाले. दोन्ही अधिवेशनात त्यांनी केलेल्या भाषणात निझामाला इशारा दिला होता. यातून संग्रामाला नवा आशय, नवी दिशा आणि  प्रेरणा मिळाली होती.