आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी मुलगी आहे, याआधारे कधीच निर्णय घेतला नाही : दीपिका पदुकोण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मला आणि माझ्या बहिणीला आपल्या आशा-आकांक्षांचे आकाश कधीच अरुंद करण्याची गरज पडली नाही. आमच्या कुटुंबात माझे वडील एकटे पुरुष आहेत. मात्र, आमच्या सर्वांच्या अपेक्षांचा कुटुंबात पूर्ण सन्मान होतो. जेव्हा तुमच्यावर मर्यादा नसतात, जेव्हा तुमच्यावर कुटुंबाच्या अपेक्षांचे ओझे नसते तेव्हा तुम्ही सशक्त होता आणि आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगता. तुमची आवड तुमच्या फिंगरप्रिंटसारखी असते, जी तुम्हाला जगात वेगळी ओळख देते. भारत संस्कारशील देश आहे आणि आपल्या उत्कृष्ट परंपरांचे पालन केवळ भारतीय महिलांनीच नव्हे तर भारताच्या प्रत्येक नागरिकाने आनंदाने करायला हवे. तरीही काही ठिकाणी जेव्हा महिला स्वत:साठी काही करतात तेव्हा त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जाते. महिला स्वत:साठी विचार करताहेत ही चांगली गोष्ट आहे. बदल होत आहेत. जीवनात अनेकदा धडाडीचे निर्णय घ्यावे लागतात, त्यासाठी प्रत्येक महिलेने सज्ज राहायला हवे. आम्हाला माहीत आहे की, अनेक वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत महिलांनी येणे चांगले मानले जात नव्हते. आई-वडील मुलींना त्यात येऊ देत नव्हते. मात्र, ही धारणा बदलली आहे. यामुळेच नवनवे दिग्दर्शक, निर्माते, लेखक, तंत्रज्ञ आणि कलाकार म्हणून महिला मोठ्या संख्येने येत आहेत आणि यशस्वीही होत आहेत. असे सांगतात की, लग्नानंतर व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनात संतुलन साधण्याची गरज भासते. मात्र, या विचाराशी मी सहमत नाही. माझ्या दृष्टीने त्याचा लग्नाशी कोणताही संबंध असू नये. मी १७ व्या वर्षी कामाला सुरुवात केली होती. लग्नाच्या आधी मी जसे काम करत होती, तसेच लग्नानंतरही करत आहे. माझ्या दृष्टीने समानता कोणत्याही स्थितीत समानताच हवी. मग ते कुटुंब असो की काम. समानतेला गुणांच्या दृष्टिकाेनातून बघायची गरज असते. उदाहरणार्थ गुण आणि योग्यतेच्या आधारे वेतन निश्चित व्हायला हवे, लिंगाच्या आधारे नव्हे. महिला खूप चांगली मल्टिटास्किंगची कामे करतात. महिला दररोज असे काम करताहेत ज्यात विविध प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक शक्तीची गरज असते. नाहीतर मल्टिटास्किंग शक्यच होणार नाही. महिला एका क्षणात गिअर बदलतात आणि एका कामातून दुसऱ्या कामाला लागतात ही वस्तुस्थिती आहे. महिलांच्या व्यक्तिमत्त्वात भावनांची पातळी नेहमीच उंच असते, ही दुसरी चांगली गोष्ट वाटते. त्या अधिक संवेदनशील असतात. यामुळे त्या आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत नाहीत. त्यांची अभिव्यक्ती कौतुकास्पद असते. मीदेखील नेहमीच आपल्या मनाचे ऐकले आहे आणि मला नेहमी त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. माझ्या आई-वडिलांनी मला मुलगी असल्याने कधीच काही करण्यापासून रोखले नाही. तसेच मुलगी आहे याआधारे मी कधीच निर्णय घेतला नाही. कुटुंबाने मला शिकवले की, करिअरला प्राधान्य देणे म्हणजे स्वार्थी होणे नाही, ती सर्वात मोठी गरज आहे. फक्त आपले पाय जमिनीवर ठेवा.