आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माझे काम आणि प्रेक्षक संख्येबाबत मी आशावादी आहे' : दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : एक उत्तम सामाजिक संदेश सर्वांपर्यंत पोचवणारा 'धप्पा'हा चित्रपट रविवारी टीव्हीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरमध्ये झळकला. त्यानिमित्त चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्याशी खास बातचीत...

चित्रपटाची संकल्पना निराळी आणि अनोखी आहे, कथा कशी सुचली ?
ही कथा गिरीश कुलकर्णी यांनी उत्तमरित्या लिहिली आहे. पुण्यातील एका हाऊसिंग सोसायटीत घडलेल्या घटनेवर ही कथा आधारित आहे. गिरीश कुलकर्णी यांची लेखनशैली व संकल्पना फुलवण्याची हातोटी उत्कृष्ट आहे.

चित्रीकरणादरम्यान घडलेली एखादी आठवण सांगाल का?
चित्रीकरणात एक प्रसंग आहे, ज्यात काही मुले तालीम करत असलेल्या जागी येऊन त्यांचा सेट विखरून टाकतात. या प्रसंगाबद्दल मुलांना काहीच सांगितलेले नव्हते. मुले नाचताना या सीनची एक तालीम आम्ही केली होती. त्यानंतर, आम्ही त्या मुलांना ते नेहमी करत असलेल्या पद्धतीने तालीम करायला सांगितली. त्याचवेळी मधेच इतर मंडळींनी येऊन सेट उद्धवस्त केला. त्यामुळे मुलांच्या अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया आम्हाला या प्रसंगात चित्रित करता आल्या.

लहान मुलांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
सगळीच मुले हुशार आणि चुणचुणीत होती. लहान असूनही, त्यांच्याकडून मिळणारे सहकार्य उत्तम होते. वय कमी असूनही, त्यांची एनर्जी बघण्यासारखी आहे. त्यामुळे या मुलांसोबत काम करायला खूप मजा आली.

दिग्दर्शन करताना कुठल्या गोष्टी आव्हानात्मक वाटल्या?
दिग्दर्शन हे आव्हानात्मक असतेच. हा चित्रपटसुद्धा त्याला अपवाद नव्हताच. चित्रपटाच्या सुरुवातीलाच, रिक्षांच्या शर्यतीचा एक प्रसंग आहे. त्याचे चित्रीकरण करणे, सर्वात जास्त आव्हानात्मक होते.

'धप्पा' हा चित्रपट राष्ट्रीय पातळीवर पुरस्कारप्राप्त ठरला. मात्र प्रेक्षकसंख्या हवी तशी मिळाली नाही, असे का ?
प्रत्येक विषयाचा एक ठराविक प्रेक्षकवर्ग असतो. त्याचा आकडा कालानुरूप बदलत जातो. प्रेमकथांना आज मोठी प्रेक्षकसंख्या मिळते, कालांतराने कदाचित ती कमी झालेली पाहायला मिळेल. सामाजिक संदेश देणाऱ्या सिनेमांचा प्रेक्षकवर्ग मात्र आज कमी आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती पालटलेली दिसू शकेल. मी माझ्या कामाच्या बाबतीत आणि प्रेक्षकसंख्येबाबतीत आशावादी आहे.