माझे वडील हयात नसताना असे बोलता; पवारसाहेब, तुमच्याकडून अपेक्षा नव्हती, पर्रीकरांचे पुत्र उत्पल यांची पवारांच्या वक्तव्याबद्दल खंत

राजकीय चिखलफेकीसाठी असा वापर करणे चुकीचे , पर्रीकरांचे पुत्र उत्पल यांनी पत्र लिहून वेदना कळवल्या 

दिव्य मराठी

Apr 16,2019 11:55:00 AM IST

मुंबई- शरद पवार यांनी राफेल मुद्द्यावरून दिवंगत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून पर्रीकरांचे पुत्र उत्पल यांनी पत्र लिहून वेदना कळवल्या आहेत.

“माझे वडील हयात असताना आणि धैर्याने आजाराचा सामना करत असताना नेत्यांनी त्यांचे नाव क्षुद्र राजकारणासाठी वापरण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी वडिलांनी चोख प्रत्युत्तर दिले. पण आता ते आपल्यात नसल्यामुळेच कदाचित तुम्ही त्यांचे नाव घेऊन खोटे बोलण्याचे स्वातंत्र्य घेत आहात. ज्येष्ठ व सन्मानित राजकारणी म्हणून जनतेला तुमच्याकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती,” अशा शब्दांत उत्पल यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. सोमवारी त्यांनी हे पत्र जारी केले. राफेल खरेदी व्यवहारामुळे पर्रीकर हे संरक्षणमंत्रिपद सोडून गोव्याचे मुख्यमंत्री बनले, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते.


राजकीय चिखलफेकीसाठी असा वापर करणे चुकीचे
“माझे वडलांविषयीचे आपले विधान वाचून दुःख झाले. राजकीय फायद्यासाठी असत्य पसरवण्याच्या इराद्याने त्यांचे नाव वापरण्याचा हा दुर्दैवी प्रयत्न आहे. माझे वडील आजारी असताना चौकशी करायचीही तसदी घेतली नाही त्यांनी राजकीय चिखलफेकीसाठी त्यांचे नाव घेणे दुःखदायक आहे. आपण अशा वक्तव्यांपासून दूर राहावे व पर्रीकरांवर प्रेम करणाऱ्यांना शांतपणे शोक करू दे,’ असे उत्पल यांनी पत्रात म्हटले आहे.


खोडसाळ अपप्रचाराचे भागीदार झाल्याचे दु:ख
“माझ्या वडीलांनी संरक्षणमंत्री असताना अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यापैकीच एक निर्णय राफेल विमान खरेदीचा होता. माजी संरक्षणमंत्री म्हणून आपल्या सैनिकांना शस्त्रसज्ज करण्याचे किती महत्त्व आहे, हे आपण जाणत असालच. दलांना बळकटी देण्याच्या प्रयत्नात अडथळा आणण्यासाठी खोडसाळ अपप्रचार मोहीम सुरू असून आपणही त्याचे भाग झालात, हे क्लेशकारक आहे,’ असेही उत्पल यांनी पवारांना उद्देशून म्हटले आहे.

X