आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार चालवण्यास शिकलो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला बालपणापासून कार या चारचाकी वाहनाबद्दल खूप आकर्षण होते. कारमध्ये बसलेल्या लोकांची ऐट काही वेगळीच असते, अशी माझी धारणा. गावात समोरच्याकडे बाहेरून कोणी कार घेऊन आला की, आम्ही लहान मुले कारला हात लावून खूप न्याहाळून पाहत असू. चाळीस वर्षांपूर्वी कारमध्ये बसणे हा स्वर्गसुखाच्या आनंदापेक्षाही अवर्णनीय असा असायचा. मला त्याकाळी कारमध्ये बसायला मिळेल, ही अशक्य कोटीतील बाब वाटायची. पुढे काळाच्या ओघात कार घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली; तेव्हा आपण कार घ्यावी, असा विचार डोक्यात घोळू लागला. त्यात घरच्यांचा हट्ट भरीला पडला आणि कार घेण्याचा निर्णय पक्का झाला. कार घरी आल्यानंतर ती चालवण्याचा प्रश्न निर्माण झाला. ती शिकण्याच्या कवायती सुरू झाल्या.

‘संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात’ या म्हणीप्रमाणे कारचे ब्रेक कोणते इथपासून माहिती घेणे सुरू झाले. पहिल्या दिवशी भररस्त्यात कार बंद पडली. ती मागे-पुढे करताना मला एसीमध्येही घाम फुटला. दुस-या दिवशी कार शिकण्यासाठी ड्रायव्हिंग सीटवर बसलो. भावाने मला गाडी सुरू करण्याची सूचना केली. तेव्हा गाडीची किल्लीच सापडेना. शोधाशोध केल्यानंतर किल्ली दरवाज्यालाच राहिली होती. रात्री कार चालवण्याचा अनुभव घ्यावा म्हणून लाइट सुरू करण्याचे बटण दाबले, तर समोरच्या काचेवर पाण्याचा फवाराच आला. एकदा सर्व्हिसिंग करावी म्हणून शोरूमला गाडी घेऊ न गेलो. प्रवेशद्वारावर गाड्यांच्या गर्दीत गाडीत अडकलो. सुरक्षा रक्षकाने गाडी मागे घेण्यास सांगितले तेव्हा मला रिव्हर्स घेता येत नाही, असे सांगितले. त्या सुरक्षा रक्षकाने माझी पेचप्रसंगातून सुटका केली. या सगळ्या गमती-जमतीपेक्षा माझ्या वयोवृद्ध आईला माझ्या कारमधून फिरवून आणल्याचा आनंद तर मला सद्गदित करून गेला. कारण तिच्या चेह-यावर आलेला समाधानाचा भाव माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनमोल ठेवा आहे