आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : 'गाेपीनाथ मुंडे आमचे नेते हाेते. त्यांच्या स्मारकाच्या निविदांचे काम आमच्या सरकारच्या कार्यकाळात झाले. मधल्या काळात आचारसंहितेमुळे काम थांबले हाेते. मग चार दिवसांचा मुख्यमंत्री असताना स्मारकाची ४६ काेटी रुपयांची वर्कऑर्डरही मीच काढली. त्यामुळे एकनाथ खडसे यांना या कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची गरज नव्हती,' असा प्रतिहल्ला विधानसभेचे विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 'ठाकरेंनी या कामाला स्थगिती दिली असेल तर मग त्यांच्याकडे जाणे ठीक हाेते,' असा टाेलाही त्यांनी लगावला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांना मनमाेकळी उत्तरे दिली.
भाजपत ओबीसींवर अन्याय हाेत असल्याच्या आराेपाचे खंडन करताना ते म्हणाले, 'मागच्या आघाडी सरकारच्या तुलनेत सर्वाधिक अाेबीसी नेत्यांना आम्ही मंत्रिपदे दिली. माझ्या सरकारमध्ये ३५ मंत्री मराठा, ३७ ओबीसी तर १८ एससी/ एसटी समाजाचे हाेते. ओबीसी नेत्यांना आम्ही महत्त्वाची खातीही दिली, मात्र केवळ ते ओबीसी हाेते म्हणून नव्हे, तर कार्यक्षम आहेत म्हणून ही जबाबदारी दिली हाेती,' अशी पुष्टीही फडणवीस यांनी जाेडली.
'पंकजा मुंडे आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांच्यासाेबत मी अनेक वर्षांपासून काम करत आहे. त्यांची जी काही नाराजी हाेती, ती त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे बाेलायला हवी. पंकजांशी माझा संवाद नेहमीच असताे. तीन- चार दिवसांपूर्वी मी त्यांच्याशी बाेललाे. चंद्रकांतदादाही बाेलले. यापुढेही आम्ही त्यांच्याशी बाेलत राहू. गाेपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी राज्यात कार्य करण्यास हरकत नाही, मात्र पक्षातील नेत्यांनी पक्षाचे काम हे भाजपच्याच व्यासपीठावरून करावे,' अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मुंडेंच्या जयंतीचे व्यासपीठ हे पक्षातील नाराजी बाेलण्यासाठी नव्हते, अशी टीकाही त्यांनी पंकजा मुंडे व खडसे यांच्यावर केली.
धनंजय मुंडेंना पाठबळ नाहीच
गाेपीनाथगडावरील मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी 'आमच्या सरकारमध्ये विराेधी पक्षनेते (धनंजय मुंडे) प्रबळ झाले,' असा आराेप केला हाेता. त्याचे खंडन करताना फडणवीस म्हणाले,'असे म्हणणे चुकीचे आहे. उलट विराेधी पक्षनेतेपदी असतानाही धनंजय यांच्याविरुद्ध एफआयआर नाेंदवण्याचे काम आम्ही केले. धनंजय यांनी पंकजा मुंडे यांच्यावर ज्या ज्या वेळी आराेप केले, त्या त्या वेळी मी आणि चंद्रकांतदादा सभागृहात त्यांच्या पाठीशी उभे राहिलाे. त्यांच्यावरील आराेपांचे खंडन केले.'
... तर 'मी पुन्हा येईन'
'माेदी, अमित शहा यांनी मुख्यमंत्रिपदासाठी माझे नाव जाहीर केले हाेते. त्यामुळे प्रचारात 'मी पुन्हा येईन' असे मी म्हणत हाेताे. याचा अर्थ पुन्हा अामचेच सरकार येईल, असा हाेता. पक्षनेतृत्वाने पुन्हा माझेच नाव पुढे केल्यावर 'मी पुन्हा म्हणेन' असे म्हणेनच, यात गैर काय, असे फडणवीस म्हणाले.
शिवसेना : हाक दिल्यास विचार करू
महाविकास आघाडीचे सरकार फार काही काळ टिकणार नाही. शिवसेना कालपर्यंत आमचा मित्र हाेता, मात्र या वेळी त्यांनी आमची फसवणूक केली. चर्चेची दारेही त्यांनीच बंद केली हाेती. काँग्रेस- राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना आजही आम्हाला जवळचा आहे. भविष्यात जर त्यांनी एकत्र येण्यासाठी हाक दिली तर त्याचा विचार केला जाईल,' असे फडणवीस यांनी सांगितले.
खडसेंनी नुकसान हाेईल असे बाेलू नये
खडसेंवर जेव्हा दाऊदसाेबत संभाषणाचे आराेप झाले तेव्हा मी १२ तासांत चाैकशीचे आदेश एटीएसला दिले. त्यांना क्लीन चिटही मिळाली. खडसेंचे तिकीट केंद्रीय नेत्यांनी कापले. मात्र, अन्याय करायचा असता तर त्यांच्या मुलीला तिकीट दिले नसते. खडसेंचा बेधडक बाेलायचा स्वभाव आहे. मात्र, स्वत:चे नुकसान हाेईल असे त्यांनी बाेलू नये, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.
गनिमी काव्याचा मी सहनायक
'अजित पवारांनी पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. शरद पवारांनाही याबाबत कल्पना दिली असल्याचे ते म्हणाले हाेते. अाम्ही विश्वास ठेवला व सरकार स्थापन केले. आमचा हा 'गनिमी कावा' हाेता. मात्र, ताे फसला. त्यामुळे आज टीका हाेत आहे. जर यशस्वी झाला असता तर काैतुक झाले असते. या गनिमी काव्याचे अजित पवार नायक व मी सहनायक हाेताे,' असे फडणवीस म्हणाले.
अमृता फडणवीस स्वत:चे निर्णय स्वत: घेतात, त्या माझेही ऐकत नाहीत!
'अमृता फडणवीस यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व अाहे. त्या स्वत:चे निर्णय स्वत: घेतात, ट्विटही स्वत:च करतात. त्या माझेही ऐकत नाहीत. त्याची किंमतही त्यांना मोजावी लागली. अनेकदा त्या ट्राेल झाल्या, शिवसेनेवर त्यांनी टि्वटरद्वारे टीका केली ती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत नव्हतीच. 'जर तुम्ही वृक्षताेडीमुळे आरेतील कारशेडला स्थगिती देता तर मग स्मारकासाठी वृक्षताेड का?' एवढाच प्रश्न त्यांनी उपस्थित केला हाेता. मात्र, काही राजकीय लाेकांनी खालच्या पातळीवर टीका केली,' अशी खंत देवेंद्र यांनी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.