आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बंडातात्या कराडकरांना संपवायचे होते, दैव बलवत्तर म्हणून वाचले' - आरोपी बाजीरावबुवाचा धक्कादायक कबुलीजबाब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर, पुणे : वारकरी संप्रदयातील ज्येष्ठ महाराज आणि संतवीर म्हणून ओळख असलेल्या बंडातात्या कराडकर आणि कराडकर मठाचे विद्यमान मठाधिपती जयवंत महाराज पिसाळ या दोघांनाही मला संपवायचे होते. कारण मठाधिपती पदावरून पायउतार करण्यासाठी या दोघांनीही खोटेनाटे आरोप आपल्यावर केलेले होते. दैव बलवत्तर म्हणून बंडातात्या कराडकर हे काल वाचले, असा धक्कादायक कबुली जबाब बाजीरावबुवा कराडकर याने पोलिस चौकशीत दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

पोलिसांनी सांगितले, कराडकर मठाचे यापूर्वीचे मठाधिपती भगवान महाराज कराडकर यांच्या निधनानंतर बाजीरावबुवा कराडकर याची मठाधिपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, विक्षिप्त स्वभावामुळे त्याचे वागणे वारकरी संप्रयादातील परंपरेच्या योग्यतेचे नव्हते. त्यामुळे मठाच्या विश्वस्तांनी मठाधिपती पदावरून त्याची गच्छंती केलेली होती. त्याच्या जागेवर जयवंतबुवा पिसाळ यांची नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये सर्वात अग्रेसर अशी भूमिका बंडातात्या कराडकर यांची होती.

विद्यमान मठाधिपती पिसाळ आणि बंडातात्या हे आपणाला मठात येऊ देत नव्हते. वारंवार आपल्यावर खोटेनाटे आरोप करीत होते. मठामध्ये साधे कीर्तन करण्याची देखील आपणाला मुभा नव्हती. त्यामुळेच आपण या दोघांचा काटा काढण्याच्या तयारीत होतो. मात्र, दैव बलवत्तर म्हणून बंडातात्या वाचले. कारण नेहमी महिन्याच्या एकादशीला आल्यावर ते द्वादशीच्या दिवशी पंढरीनगरी सोडतात. मात्र, या वेळी एकादशीच्या दिवशीच रात्री त्यांनी पंढरी सोडली, असा खळबळजनक कबुली जबाब या प्रकरणातील आरोपी बाजीरावबुवा कराडकर याने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बाजीरावचे वागणे वारकरी संप्रदायाप्रमाणे नव्हते : बंडातात्या

बंडातात्या कराडकर म्हणाले, कराडकर मठाशी १९७० पासून मी संबंधित आहे. या मठाच्या विश्वस्तपदी आपली नेमणूक व्हावी अशी बऱ्याच मंडळींची इच्छा होती. मात्र, आपण शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे असल्याने कराडकर मठाचे विश्वस्तपद घेतले नाही. मात्र, बाजीराव म्हणतो त्यामध्ये तथ्य आहे. कारण त्याला मठाधिपती पदावरून दूर करण्यात आपली भूमिका महत्त्वाची होती. त्याने माने गुरुजींच्या डोक्यात वीणा घातली होती. त्याचे वागणे वारकरी संप्रदायाच्या तत्त्वाप्रमाणे नव्हते. त्यामुळे त्याला मठाधिपती पदावरून दूर केले. त्याचा माझ्यावर राग असेल.

बंडातात्यांना २५ पोलिसांचे संरक्षण

मी महिन्याची एकादशी झाल्यानंतर द्वादशीच्या दिवशी पंढरपूर सोडत असतो. मात्र, लांबचा प्रवास असल्याने एकादशीच्या दिवशीच मी पंढरपूर सोडले आणि कुर्डुवाडीला मुक्कामाला गेलो. नाहीतर बाजीराव कराडकर हा जयवंत पिसाळ यांच्या ऐवजी पहिल्यांदा माझ्याच खोलीकडे मला जिवे मारण्यासाठी आला असता. विठ्ठलाच्या आशीर्वादामुळेच त्या दिवशी आपण बचावलो. मात्र, बाजीराव याने पोलिसांसमोर सांगितल्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे हे आपणाला व पोलिसांना देखील समजले. त्यामुळे आज दुपारपासून २० ते २५ पोलिस आपल्या संरक्षणासाठी येथे दाखल झालेले आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...