आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी पुन्हा गेलो... फडणवीस सरकार पायउतार, महाआघाडीचा सत्तेसाठी दावा; शरद पवार ठरले महाचाणक्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरद पवार ठरले महाचाणक्य, अजित पवारांवर आली तोंड लपवण्याची वेळ
  • विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी काेळंबकर, आज आमदारांना शपथ

​​​​​​मुंबई : रात्रीतून हालचाली करून सत्तारूढ झालेल्या भाजप सरकारला चारच दिवसांत सत्तेतून पायउतार करण्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीला मंगळवारी यश आले. त्यांनी या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना सर्वाेच्च न्यायालयाने बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश भाजप सरकारला दिले. त्यामुळे हतबल झालेल्या देवेंद्र फडणवीस व अजित पवारांना अनुक्रमे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

सुप्रीम कोर्टाचा भाजप सरकारला बुधवारी ५ पर्यंत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश
अजित पवारांनी राजीनामा देताच भाजपची खेळी फसली, सत्ता सोडण्याची घोषणा
शपथविधीच्या चार दिवसांतच फडणवीस यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची संयुक्त बैठक, पवारांकडून उद्धव ठाकरे यांचे नाव जाहीर
महाविकास आघाडीची नेतेमंडळी राजभवनात, राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा दाखल
आज विधानसभेचे विशेष अधिवेशन, हंगामी अध्यक्ष देतील आमदारांना शपथ

महाराष्ट्राचं नेतृत्व योग्य व्यक्तीच्या हाती जावं यासाठी आम्ही सर्वांनी ही जबाबदारी उद्धव ठाकरेंवर सोपवली. आज बाळासाहेब असते तर त्यांना आनंद झाला असता. बाळासाहेबांनी लहानातल्या लहान कार्यकर्त्यांना संधी दिली. - शरद पवार

माझं सरकार म्हणजे आपल्या सर्वांचे सरकार. कुणाशीही सुडाने वागणार नाही. ३० वर्षं ज्यांच्यासोबत मैत्री ठेवली त्या मित्रांनी विश्वास नाही ठेवला. पण ज्यांच्याशी ३० वर्षं सामना केला, ते राजकीय विरोधक माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. - उद्धव ठाकरे

काेर्टाच्या निर्णयाने महाविकास आघाडीच्या गाेटात चैतन्य निर्माण झाले. त्यांनी तातडीने बैठक घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घाेषित केले व राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावाही केला. २८ नाेव्हेंबर राेजी नव्या सरकारचा शपथविधी हाेणार आहे. दरम्यान, राज्यपालांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजप आमदार कालिदास काेळंबकर यांची निवड केली. बुधवारी सकाळी ८ वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन हाेणार असून त्यात काेळंबकर सर्व आमदारांना शपथ देतील.

सुप्रीम काेर्टाची चपराक : निकालानंतर फडणवीस सरकार पायउतार, महाआघाडीचा सत्तेसाठी दावा

सुप्रीम कोर्ट : ३० तासांत बहुमत सिद्ध करण्याचे देवेंद्र यांना आदेश


सुप्रीम कोर्टाने फडणवीस यांना बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. बहुमत चाचणी गुप्त मतदानाने होणार नाही, त्याचे थेट प्रक्षेपण करा, विधानसभा अध्यक्ष निवडीची गरज नसल्याचेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

राजीनामे : अजित पवारांनंतर फडणवीसही झाले पायउतार


सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अजितदादांनी फडणवीस यांच्यांकडे उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला. यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत बहुमत नसल्याने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घाेषणा केली. सेनेवरही आगपाखड केली.

सुबह का भूला... : अजितदादा शरद पवार यांच्या बंगल्यावर; प्रमुख नेत्यांसाेबत चर्चा

मुंबई : बंडाचा प्रयत्न फसल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणाऱ्या अजित पवारांना माफ करुन पुन्हा पक्षात सक्रिय करावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे लावून धरली आहे. कुटुंबीयांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अजित पवार मंगळवारी रात्री शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक' बंगल्यावर गेले हाेते. तिथे पवार कुटुंबीय यांच्यासह शरद पवारांची त्यांनी भेट घेतली. जयंत पाटील व राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही अजित पवारांशी तिथे चर्चा केली.

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचे राज्यपालांकडे पत्र


महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला. शिवसेेनेला पाठिंबा असल्याचे पत्र दाेन्ही काॅंग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांकडे यावेळी सुपूर्दही केले.

राज्यातील भाजपच्या नेत्यांवर विसंबून राहिल्याने शहांचा प्लॅन बिघडला

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मोदी, शहा व नड्डांत बैठक झाली. अजितदादा एकाकी पडल्याने फडणवीसांनी राजीनामा द्यावा, असे ठरले. फडणवीस व अजितदादांतील चर्चेनंतरच शहांनी सत्तेची जबाबदारी महाराष्ट्र भाजपवरच सोडली. येथेच चूक झाली. सूत्रांनुसार, मोदी-पवारांतील बैठकीत सत्ता स्थापनेवर एकमत झाले होते. सेना-काँग्रेसशी जुळले नाही तर भाजपसोबत येऊ, असे पवारांचा विचार होता. मात्र गुपचूप शपथविधी झाल्याने पवारांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला.
 

बातम्या आणखी आहेत...