आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्ष सांगेल तेथून निवडणूक लढविणार : छगन भुजबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवला- अडचणीच्या काळात मला साथ देऊन स्वीकारले. मतदारांनी तीनदा येथून निवडून दिले. त्यामुळे येवलेकरांचे उपकार मी विसरू शकणार नाही अशा शब्दांत ऋण व्यक्त करतानाच आगामी निवडणूक पक्ष सांगेल तेथून लढविणार, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ते लोकसभेची की विधानसभेची निवडणूक लढविणार याबाबत साशंकता मात्र कायम राहिली. 


येवला दाैरा अाटाेपल्यानंतर संपर्क कार्यालयात त्यांनी स्थानिक पत्रकारांशी चर्चा केली. नाशिकने तुम्हाला मागील लोकसभा निवडणुकीत नाकारले होते मग पक्षाने आदेश दिल्यावरही तेथून लढणार काय या प्रश्नावर बोलताना भुजबळ म्हणाले की, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. मोदी लाटेत सर्वच पक्ष गारद झाले होते. आता ती लाट ओसरली असल्याने भीती नाही. येवल्याविषयी कुठेही कोणी काही वाईट बोलले तर मला वाईट वाटते. आजही मंत्रालयासह राज्यात येवला आणि भुजबळ यांचे समीकरण कायम असून काही अधिकारी येवला म्हटले की भुजबळ म्हणून टेबलावर असलेली फाइल एक तर खाली ठेवतात, अन्यथा फाइल वर काढून मंजूर करतात. माझ्या मंत्रिपदाचा काळात येवला एक सुंदर शहर होते. त्याची झालेली अवस्था बघून मला वाईट वाटते. येथे उभारलेल्या चांगल्या इमारतींची देखभाल अधिकाऱ्यांनी ठेवणे आवश्यक असून प्रशासकीय इमारतीची वास्तू ही संपूर्ण राज्याचे मॉडेल ठरले होते याची आठवण ठेवून नागरिकांना सेवा देणे आवश्यक अाहे. जर मी नसताना मतदारसंघाची आबाळ सुरू असेल, तर माध्यमे गबाळ्यांना का मोठे करताहेत, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. फक्त येवल्याच्याच नव्हे, तर संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी अापण पदावर असताना अाणि नसतानाही सतत प्रयत्न केले. अगदी तुरुंगात असतानाही पाणीप्रश्नासह महत्त्वाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांना पत्रे लिहिल्याचे त्यांनी सांगितले. 


पत्रकार परिषदेत म्हणाले... 
- नाशिक फेस्टिव्हलचे जे प्रायोजक झाले होते, त्यात इंडिया बुल्ससारख्या कंपनीकडून खर्चाचे रितसर धनादेश घेतले, तरी आमच्यावर केसेस झाल्या, तेव्हा एकही नाशिककर आमच्यामागे उभा राहिला नाही. मात्र, देशाभरात हा उपक्रम नावाजला गेला. 
- येवल्यातील विकासाला मी अडचणीत असताना खीळ बसली असली तरी आपण सर्व माझ्या पाठीशी उभे रहा, विकासकामे मार्गी लावू, अशी मी ग्वाही देताे. 
- २७ वर्षे शिवसेना सोडून झाली तरी लोक मी शिवसेना सोडल्याचे आजही विसरत नाही. मी इतकी वर्षे त्या पक्षात राहिल्यानेच अडचणीच्या काळात जो अन्याय झाला तो मान्य नसल्याने त्यांनी माझ्याविषयी सहानुभूती दाखविली. 
- राष्ट्रवादी सोडण्याचा कुठलाही विचार नाही. पवारसाहेबांवर माझा पूर्ण विश्वास असून त्यांचासारखा दूरदृष्टीचा व शेतकऱ्यांसाठी काम करणारा एकही नेता नाही. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर मला खूप काही शिकण्यास मिळाले. 
- नाशिककरांवर कराचा जो बोजा महापालिकेने लादला आहे, तो अतिरिक्त असून अधिकाऱ्यांनी कार्यक्षम असले पाहिजे, परंतु नागरिकांच्या हिताची बाजू घेणे गरजेचे असून त्यासाठीच मी नाशिकला महापालिकेवर मोर्चा काढला. 

बातम्या आणखी आहेत...