आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर शहराला शंभर वर्षे पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन करणार, पालकमंत्री अमित देशमुखांचा लातुरकरांना शब्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लातूरला डायमंडचे दिवस- बाळासाहेब थोरात

लातूर- शहराला मागच्या काही वर्षांत सातत्याने भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले आहे. मात्र पुढची शंभर वर्षे पुरेल एवढे पाणी आणण्याचे नियोजन केले जात असून आगामी काळात काळात लातूरचा पाणी प्रश्न कायमचा मिटवला जाईल, असा दावा पालकमंत्री अमित देशमुख यांनी रविवारी केला. लातूरमधील टाऊन हॉल मैदानावर रविवारी सायंकाळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अमित देशमुखांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुखांची उपस्थिती होती. 

अमित देशमुख पुढे म्हणाले की, शिक्षण, व्यापारी, उद्योग, कृषी अशा सर्वच क्षेत्रात लातूरने प्रगती केली आहे. मात्र केवळ पाण्याच्या कमतरतेमुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने लातूरला पाण्याची कायमस्वरूपी सोय करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला तर हा प्रश्न निकालात निघू शकतो. पाणीपुरवठा खात्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांना सोबत घेऊन आम्ही लातूरच्या पाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यासाठी येत्या एक दोन दिवसांत बैठकही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

लातूरला डायमंडचे दिवस- बाळासाहेब थोरात 


उद्धव ठाकरेंनी इच्छाशक्ती दाखवल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. या मंत्रिमंडळात लातूरला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. त्यामुळे लातूरला केवळ सोन्याचेच नव्हे तर डायमंडचे दिवस येणार आहेत, याची खात्री लातूरकरांनी बाळगावी. आमचे सरकार तीन वेगवेगळ्या पक्षांचे असले तरी समान कार्यक्रमावर आम्ही ते पाच वर्षे सक्षमपणे चालवू, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...