आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - येथील घाटकोपर उपनगरातून एका 35 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव रुपेश कुमार अनिल कुमार असून तो इंटेलिजेन्स ब्युरो (आयबी) मध्ये अधिकारी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो गेल्या काही दिवसांपासून एका महिला पोलिस काँस्टेबलचा पाठलाग करत होता. तिनेच दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी रुपेशला अँटॉप हिल येथील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.
पंत नगर पोलिस स्टेशनमध्ये 34 वर्षीय महिला पोलिसाने रविवारी एक तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, रुपेश आणि तिची ओळख छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाली होती. या ठिकाणी दोघांची ड्युटी लागली असताना परिचय झाला होता. यानंतर महिला पोलिसाची बदली मुंबई पोलिसांच्या सोशल ब्रांचमध्ये करण्यात आली. परंतु, तेव्हापासून आपण या महिलेशी कधीच संपर्क केला नाही असा दावा संशयित आरोपीने केला आहे. महिलेने केलेल्या आरोपानुसार, वेग-वेगळ्या ठिकाणी ड्युटी लागली तेव्हापासूनच आयबी अधिकारी रुपेशने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तरीही रुपेशने वारंवार तिचा पाठलाग केला. आरोपीच्या विरोधात पोलिसांनी कलम 354 (ड) अंतर्गत पाठलाग करण्याचा गुन्हा दाखल केला. यानंतर कोर्टात सादर केले असता त्याला जामीन देण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.