आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ICC World Cup : भारताचा विजयारंभ, द. आफ्रिकेवर ६ गड्यांनी मात; रोहित ठरला सामनावीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साऊथम्पटन
युवा फलंदाज रोहित शर्माच्या (१२२*) नाबाद शतकाच्या जोरावर टीम इंडियाने विश्वचषक २०१९ च्या आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघावर ६ गडी राखून मात करत विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ९ बाद २२७ धावा उभारल्या. सामन्यात लेगस्पिनर यजुवेंद्र चहलने ४ विकेट घेतल्या. १६ वर्षांनी भारतीय लेगस्पिनरला कोणत्याही विश्वचषकात ४ विकेट मिळाल्या आहेत. २००३ मध्ये अनिल कुंबळेने हॉलंडविरुद्ध ४ बळी घेतले होते. प्रत्युत्तरात भारताने ४७.३ षटकांत ४ गडी गमावत २३० धावा करत बाजी मारली. शिखर धवन ८ धावांवर बाद झाला. कर्णधार विराट कोहलीने ३४ चेंडूत १८ आणि लोकेश राहुलने ४२ चेंडूत  २६ धावा काढल्या. हार्दिक पांड्या १५ धावांवर नाबाद राहिला. महेंद्रसिंग धोनीने ४६ चेंडूत २ चौकारांसह ३४ धावा जोडल्या. द. आफ्रिकेच्या रबाडाने २ आणि मॉरिसने एक विकेट घेतली. 

 

सलामीवीर रोहित शर्माचे धमाकेदार शतक; पोहोचला सचिन, गांगुली, धवनच्या पंगतीत

रोहित शर्माने धमाकेदार नाबाद शतक ठोकले. त्याने १४४ चेंडूत १३ चौकार व २ षटकार खेचत नाबाद १२२ धावा काढल्या. तो विश्वचषकात २ पेक्षा अधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत सचिन, गांगुली, द्रविड, धवन, कोहली, सेहवागच्या पंगतीत जाऊन बसला. धोनी व रोहितने अर्धशतकी भागीदारी केली. 

 

टर्निंग पॉइंट

> बुमराहचा पहिला स्पेल. यात दोन्ही सलामीवीर टिपले. या दबावातून आफ्रिका कायम राहिली.
> फिरकीपटूंचे लढतीत ५ बळी. ४ चहलने, १ कुलदीपने. आफ्रिकेच्या फिरकीपटूला विकेट नाही.

> भारताच्या डावात दुसऱ्या षटकात डुप्लेसिसने रोहितचा झेल सोडला. तो एका धावेवर होता. 
 

 

डेटा पॉइंट 

> पहिल्यांदा विश्वचषक सामन्यात द. अाफ्रिकेच्या ७, ८ व ९ व्या फलंदाजाने ३० + धावा केल्या. 
>  जेव्हा बुमराह, भुवी, कुलदीप, चहल खेळतात, तेव्हा भारत लक्ष्य गाठताना ११ पैकी १० वेळा विजयी.

> भारताकडून हे विश्वचषकातील २६ वे शतक ठरले. सर्वाधिक शतकांमध्ये ऑस्ट्रेलियाशी बरोबरी केली.

 

मॉरिस व रबाडाने ६६ धावांची भागीदारी 

संघाच्या १५८ धावांवर ७ गडी बाद झाल्यानंतर आलेल्या मॉरिस (४२) व रबाडाने (३१*) ६६ धावांची भागीदारी केली. कर्णधार प्लेसिसने  ३८ व डुसेनने २२, डिकॉकने १०, फेहलुकवायोने ३४ व मिलरने ३१ धावा केल्या. अनुभवी डुमिनी (३) अपयशी ठरला. 

 

बुमराहच्या २ विकेट; ८ वर्षांत कमी सरासरी 

बुमराहने १० षटकांत ३५ धावा देत २ विकेट घेतल्या. हा बुमराहचा विश्वचषकातील पहिला सामना होता. २०११ नंतर भारतीय वेगवान गोलंदाजाने सर्वात कमी सरासरी नोंदवली. २०११ मध्ये आशिष नेहराने पाकिस्तानविरुद्ध १० षटकांत ३३ धावांत २ बळी घेतले होते. हा बुमराहचा ५० वा वनडे ठरला. 


1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकला तेव्हा स्पर्धेत भारताच्या  स्पिनर्सनी 5 बळी घेतले, आता एका सामन्यातच ५ बळी 

 

भारताच्या विजयाची दोन सूत्रे 

टाॅप-3 फलंदाज
> भारताचे धवन, रोहित आणि कोहलीने केल्या १४८ धावा.
> आफ्रिकेच्या डुप्लेसिस, आमला व डिकॉकच्या ५४ धावा.
टाॅप-2 स्पिनर
> भारताच्या चहल आणि कुलदीपने घेतले ५ बळी.
>  द. आफ्रिकेच्या स्पिनरला एकही बळी मिळाला नाही.

 

पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाची वाटचाल 
1983: जगज्जेता
1996: उपांत्य फेरी
2003: रनरअप
2011: जगज्जेता 
2015: उपांत्य फेरी
2019: स्पर्धा सुरू

दुसरा सामना ९ जूनला ऑस्ट्रेलियाशी, सर्व तिकिटे बुक 
ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या भारताच्या सर्व सामन्यांची तिकिटे बुक झाली आहेत.

 

रोहितच्या धावांचा पाठलाग करताना ३८ वेळा ५०+ धावा, ३० वेळा भारत विजयी
रोहित शर्माने १२२* धावा केल्या. हे रोहितचे विश्वचषकातील दुसरे शतक तर कारकीर्दीतील २३ वे वनडे शतक आहे. रोहितने २०१५ मध्ये बांगलादेशाविरुद्ध १३७ धावा केल्या होत्या. भारताकडून सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत तो सौरव गांगुलीला (२२) मागे टाकून तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. सचिन ४९ शतकांसह पहिल्या, कोहली ४१ शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे.

 

बुमराह : स‌‌र्वात किफायती 
बुमराहने विश्वचषकातील दुसरा सर्वात किफायतशीर स्पेल (१० षटके, ३५ धावा) टाकला. यापूर्वी नेहराने ३३ धावा दिल्या होत्या.