आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना-भाजपने जागा सोडली नाही तर आपण अपक्ष लढणार; काँग्रेसचे बंडखोर आ. कोळंबकरांचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आत्ताच आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये जाणार नाही.  तसे केल्यास मला वेगाने कामे करता येणार नाहीत. त्यामुळे मी योग्य वेळी निर्णय घेईन. युतीने मला तिकीट दिले नाही तरीही मी अपक्ष म्हणून विधानसभा लढवेल आणि माझी ताकद दाखवून देईन, असा इशारा काँग्रेसचे बंडखोर आमदार कालिदास कोळंबकर यांनी युतीला दिला आहे. 


लोकसभा निवडणुकीत कालिदास कोळंबकर यांनी उघडपणे शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचार केला. परंतु विधानसभेला त्यांना तिकीट मिळेल की नाही, अशा शंका उपस्थित होत असल्यानेच त्यांनी अपक्ष उमेदवारीचे सूतोवाच केले आहे. कालिदास कोळंबकर हे १९९० पासून आमदार आहेत. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनीही राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु आता त्यांचा ओढा भाजपकडे दिसून येत आहे.


२०१४ मध्ये वेगळे लढलेल्या भाजप-शिवसेनेने पुन्हा एकत्र येत आगामी विधानसभा निवडणुका लढण्याचे ठरवले आहे. जागावाटपाची चर्चा अजून सुरू झालेली नाही. जे मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत, त्या मतदारसंघातील काँग्रेस आमदारांना पक्षात कसे घ्यायचे आणि शिवसेना त्या जागा सोडणार का, असा प्रश्न निर्माण झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येण्याच्या विचारात असलेल्या आमदारांना तिकिट मिळेल का, असा प्रश्न सतावू लागला आहे. कालिदास कोळंबकर, जयकुमार गोरे, भारत भालके, गोपालदास अग्रवाल यांचे मतदारसंघ युतीच्या मागील जागावाटपात शिवसेनेकडे होते.

 

‘माझ्यामुळेच शिवसेनेच्या शेवाळेंना मते मिळाली’
कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे. ते म्हणतात, काँग्रेसची सत्ता असताना माझ्या मतदारसंघात काहीही काम न झाल्याने मी काँग्रेसवर नाराज आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवले आहेत. नायगावमधील जनता माझ्या पाठीशी आहे. मी युतीला पाठिंबा दिल्याने माझ्या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांना सर्वाधिक मते मिळाली, असा दावाही त्यांनी केला.