आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अच्छे दिन आले नसतील तर 'त्यांना' नाकारा, नामविस्ताराच्या सोहळ्यात रस्त्यावर तरुणांकडून राजकीय जागर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबा- नामविस्तार सोहळ्यानिमित्त विद्यापीठ गेट परिसरात सळसळते चैतन्य पाहायला मिळत होते. आबालवृद्ध मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत होते. या भाऊगर्दीत मोठमोठ्या सभांव्यतिरिक्त रस्त्यावरही राजकीय जागर पाहायला मिळाला. काही युवक वेगवेगळ्या पक्षांचे कपडे घालून कोणत्या पक्षाला का मतदान करणार नाही हे शर्टवर नोंद करायला सांगत होते, तर वंचित बहुजन आघाडीच्या कला पथकाने थेट 'अच्छे दिन आले का?' असे विचारत ते आले नसतील तर 'त्यांना' नाकारा, असा थेट संदेश दिला. 


विद्यापीठ गेट परिसर सकाळपासून अभूतपूर्व उत्साहाने फुलून गेला होता. आबालवृद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत समाधान व्यक्त करत होते. गेटसमोर फोटो घेण्याचा मोह कोणालाच आवरत नव्हता. औरंगाबाद लेणीपर्यंतचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. विविध संघटनांच्या वतीने आयोजित सभास्थळी लगबग होती. तेथे सुरू असलेल्या भीमगीतांनी वातावरण अधिक भारावलेले होते. 


कलापथकाने केले हलगीच्या तालावर मनोरंजन 
वंचित बहुजन आघाडीचे कला पथक हलगीच्या तालावर मनोरंजन करत होते. सुमारे १५ तरुण -तरुणींच्या पथकाने सद्य:स्थितीवर भाष्य करत सगळ्यांचे लक्ष वेधले. उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी आपल्यावरील अन्याय अजूनही संपलेला नाही हे सांगताना अच्छे दिन आले का? असे विचारत ते जर आले नाही तर 'त्यांना' नाकारा, असा थेट संदेशच उपस्थितांना देत टाळ्यांची दाद मिळवली.    

 

अच्छे दिन आले नसतील तर 'त्यांना' नाकारा 
मतदानाचा प्रचार करत होते. पण त्यांचा प्रचार अनोखा होता. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस असे लिहिलेले शर्ट परिधान करून युवक फिरत होते. त्यावर पक्षाचे नाव आणि आम्हाला मतदान करू नका, असा संदेश होता. येणाऱ्या-जाणाऱ्यांना ते यापैकी कोणत्या पक्षाला आपण का मतदान करणार नाही, हे पेनने लिहायला सांगत होते. लोकही मग ज्या पक्षाला मतदान करायचे नाही त्या पक्षाचे नाव घेऊन संबंधित शर्ट घातलेल्या तरुणांना बोलावून त्यांना का नाकारायचे याचे कारण लिहीत होते. पक्षांबद्दलचा रोष यातून सगळ्याच पक्षांच्या बाबतीत कमीअधिक प्रमाणात व्यक्त होत होता. सत्तेत असलेल्या भाजपच्या विरोधात लिहिण्यासाठी जास्त गर्दी होत होती. यात एक मुलगा निळ्या झेंड्यांचा पक्ष असे लिहिलेला शर्ट परिधान करून उभा होता. त्यावर मात्र 'स्वातंत्र्य, न्याय, समता बंधुता प्रस्थापित करण्यासाठी मला मतदान करा,' असा संदेश होता. पक्षांच्या विरोधात लिहिणाऱ्यांना शेवटी तो दाखवला जायचा. 
 

बातम्या आणखी आहेत...