आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If The Lokshbha Trend Continues, The Coalition Can Be Voted In Six Constituencies In The Assembly

लाेकसभेचा कल कायम राहिल्यास युतीला विधानसभेत 228 मतदारसंघांत काैल शक्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे लढूनही सत्तेसाठी एकत्र अालेल्या भाजप-शिवसेनेने मागील पाच वर्षे भांडत भांडत का हाेईना पण 'सत्तेचा संसार' सुखाने केला. नुकत्याच झालेल्या लाेकसभा निवडणुकीच्या ताेंडावर या दाेन्ही पक्षांनी २५ वर्षांच्या मैत्रीचे दाखले देत पुन्हा युती केली अन‌् काँग्रेस-राष्ट्रवादीला अक्षरश: धाेबीपछाड दिली. लाेकसभेच्या ४८ मतदारसंघांत समाविष्ट असलेल्या २८८ विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक २२८ जागांवर भाजप-शिवसेनेने वर्चस्व मिळवले, तर काँग्रेस-राष्ट्रवादीसह ५६ पक्षांची आघाडी अवघ्या ४४ जागांवरच गुंडाळली गेली. लाेकसभेतील मतदानाचा हा कल कायम राहिल्यास अाॅक्टाेबर महिन्यात हाेणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा एकहाती सत्ता मिळवणे युतीला जड जाणार नाही, असा निष्कर्ष राजकीय तज्ञांकडून काढला जात आहे. असे असले तरी लाेकसभा व विधानसभेचा काैल वेगवेगळा असताे हे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमधील मतदारांनी दाखवून दिले आहे. एक मात्र खरे की, लाेकसभेतील अपयशानंतर खचलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीतून माेठ्या प्रमाणावर आउटगाेइंग सुरू झाल्याने या पक्षांना ऊर्जितावस्था मिळणे कठीण मानले जाते. दलित, मुस्लिम मतदारांच्या जाेरावर दाेन्ही काँग्रेसच्या व्हाेट बँकेवर ताबा मिळवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचीही आता शकले उडू लागली आहेत. तसे झाल्यास आपली दलित- मुस्लिम ही पारंपरिक व्हाेट बँक पुन्हा मिळवण्याच्या दाेन्ही काँग्रेस च्या आशा पल्लवित हाेतील. लाेकसभेची लढाई जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सलग दुसऱ्यांदा राज्याची सत्ता युतीच्या ताब्यात घेण्यास सज्ज झाले आहेत. आपले बालेकिल्ले सक्षम करण्याबराेबरच गलितगात्र झालेल्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडे नेते आपल्या गाेटात सामील करण्याची या नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच लागलेली दिसते. एक-एक जागा महत्त्वाची मानत आपापल्या भागात चांगले वजन असलेले विराेधी पक्षातील साखरसम्राट, शिक्षणसम्राटांना सत्तेचे आमिष दाखवून गळाला लावण्याचे प्रयत्न या दाेन्ही पक्षनेत्यांकडून समजुतीने हाेत आहेत. त्यामुळे विराेधी पक्ष लढाईपूर्वीच घायाळ झालेला दिसताे.

विराेधी गडांना युतीचा सुरुंग
वंचितला लोकसभेला १८ जागांवर प्रत्येकी १ लाखांवर मते
'भारिप'चे नेते प्रकाश अांबेडकर व एमआयएमच्या पुढाकारातून यंदाच्या लाेकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी अस्तित्वात आली. काँग्रेस- राष्ट्रवादीशी वाटाघाटीत न अडकता त्यांनी राज्यातील सर्वच ४८ लाेकसभा मतदारसंघांत निवडणूक लढवून ७.२ टक्के मते घेतली. तसेच अाैरंगाबादेत एमआयएमचा एक खासदार निवडूनही आणला. या आघाडीने दलित-मुस्लिम ही काँग्रेस-राष्ट्रवादीची व्हाेट बँक आकर्षित केल्याने त्यांचा काँग्रेस आघाडीला फटका बसला. वंचितने १८ मतदारसंघांत प्रत्येकी १ लाखाहून अधिक मते घेतली.

असे फिरले आघाडीचे फासे : 2014 विधानसभा ते 2019 लोकसभा तुलना
पक्ष : 2014 : 2019 : फरक
भाजप : 122 : 128 : +6
शिवसेना : 63 : 100 : +37
काँग्रेस : 42 : 21 : -21
राष्ट्रवादी : 41 : 23 : -18

- कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या साेलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंना नाही मिळू शकले मताधिक्य
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांच्या संगमनेर मतदारसंघाचाही शिवसेनेलाच काैल
- अमरावतीत राणा नवनीत यांना पुरस्कृत केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक खासदार वाढू शकला.
- बीड, नगर, श्रीगाेंदा, फलटण, नांदगाव, तासगाव हे राष्ट्रवादीचे विधानसभेतील हक्काच्या मतदारसंघातूनही लाेकसभेला भाजपला साथ.
- मावळमध्ये पार्थ पवारांच्या पराभवामुळे अजित पवारांच्या प्रतिष्ठेला धक्का
- शिवसेनेचे बंडखाेर बाळू धानाेरकरांमुळे चंद्रपूरमध्ये भाजपला धक्का देत एका जागेचे का हाेईना अस्तित्व राखणे काँग्रेसला शक्य.

काँग्रेसकडून भाजपकडे : 17 जागा
मताधिक्य : जागा
40 हजारांपेक्षा जास्त : 5
20 हजारांपेक्षा जास्त : 8
10 ते 20 हजारांदरम्यान : 4
10 हजारांपेक्षा कमी : 0

काँग्रेसकडून शिवसेनेकडे : 12 जागा
मताधिक्य : जागा
40 हजारांपेक्षा जास्त : 3
20 हजारांपेक्षा जास्त : 5
10 ते 20 हजारांदरम्यान : 0
10 हजारांपेक्षा कमी : 4

राष्ट्रवादीकडून भाजपकडे : 11 जागा
मताधिक्य : जागा
40 हजारांपेक्षा जास्त : 6
20 हजारांपेक्षा जास्त : 2
10 ते 20 हजारांदरम्यान : 1
10 हजारांपेक्षा कमी : 2

राष्ट्रवादीकडून शिवसेनेकडे : 12 जागा
मताधिक्य : जागा
40 हजारांपेक्षा जास्त : 4
20 हजारांपेक्षा जास्त : 3
10 ते 20 हजारांदरम्यान : 2
10 हजारांपेक्षा कमी : 3

युतीने खेचल्या ४३ जागा
२०१४ च्या विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे एकूण ८३ जागा होत्या. त्याच्याशी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील विधानसभा मतदारसंघनिहाय निकालांची तुलना केली असता युतीने आघाडीच्या ८३ पैकी ४३ जागा खेचून आणल्या आहेत.

१४ जागांवर मात्र धक्का
२०१४ मध्ये शिवसेना-भाजप पक्षांच्या आमदारांची एकूण संख्या १८५ होती. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील विधानसभा मतदारसंघनिहाय निकालांची तुलना केली असता काँग्रेस आघाडीने युतीच्या १४ जागा आपल्याकडे घेण्यात यश मिळवल्याचे दिसते.

आता विधानसभेवर लक्ष
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने राज्यातील २२८ विधानसभा मतदारसंघांत भरीव आघाडी घेतली. म्हणजेच २०१४ विधानसभेच्या तुलनेत त्यांचे ४३ मतदारसंघांत वर्चस्व वाढले आहे. हेच वर्चस्व विधानसभेलाही कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

आघाडीला ३९ जागी ताेटा
काँग्रेस-राष्ट्रवादीने २०१४ विधानसभेत ८३ जागा जिंकल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निकालांचा विचार केल्यास त्यांना फक्त ४४ विधानसभा मतदारसंघांतच वर्चस्व राखता आले. म्हणजेच त्यांना एकूण ३९ जागांचा फटका बसल्याचे दिसते.

एमआयएमने सोडली साथ, आता वंचितचे भवितव्य अधांतरी
स्थापनेपासून आठ महिन्यांतच एवढी भरारी घेणाऱ्या वंचित आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ९ जागांवर पराभव पत्करावा लागला. या यशामुळे वंचित आघाडीचा आत्मविश्वास वाढला हाेता. विधानसभेलाही काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून न घेता स्वबळावर आमदार निवडून आणण्याची तयारी त्यांनी केली आहे. मात्र जागावाटपाच्या वादातून एमआयएमने 'तलाक' दिल्यामुळे या वंचित आघाडीचे भवितव्य आता अधांतरी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीची हाेऊ शकते निम्म्या जागांपर्यंत घसरण; फुटीमुळे वंचित बहुजन अाघाडीचाही प्रभाव घटण्याची शक्यता
विराेधकांत नेतृत्वाचा संभ्रम
खुद्द पक्षाध्यक्ष राहुल गांधींनीच राजीनामा दिल्यामुळे देशभर संभ्रमावस्थेत असलेल्या काँग्रेसमध्ये महाराष्ट्रातही गाेंधळाचे वातावरण अाहे. त्यातच भाजपने विराेधी पक्षनेताच पळवल्यामुळे व प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे निवडणुकीचे सुकाणू द्यायचे काेणाच्या हाती असा प्रश्न काँग्रेसींसमाेर हाेता. अखेर बाळासाहेब थाेरात या निष्ठावंत ज्येष्ठ नेत्यावर विश्वास ठेवूनच काँग्रेसला विधानसभेच्या मैदानात उतरावे लागले. दुसरीकडे, विसाव्या वर्षात असलेल्या राष्ट्रवादीत अजूनही ७८ वर्षीय पक्षाध्यक्ष शरद पवारांशिवाय दुसरे सक्षम नेतृत्व तयार हाेऊ शकले नाही. अंतर्गत गटबाजी व पक्षफुटी ही दाेन्ही काँग्रेससाठी डाेकेदुखी ठरत अाहे.