आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबीर कला मंचचा कार्यक्रम वस्तीत झाला नसता तर एवढं घडलंच नसतं ! संशयित नक्षली संताेषच्या आई सुशीला यांची भावना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 पुणे - “कबीर कला मंचाचा कार्यक्रम वस्तीत घेतला नसता तर एवढं झालं नसतं. त्यानं कुठंबी असंल तिथनं घरी यावं. ना चिठ्ठी ना फोन.. आम्ही वाट बघतुया. एवढा निरोप संतोषला द्या,’ असे त्याची आई सुशीला शेलार सांगतात. घरात गंभीर आजाराने अंथरुणाला खिळलेले वडील वसंत शेलार यांनी आयुष्यभर लोकांच्या घराच्या भिंती रंगवून उपजीविका केली. त्यांना घर सोडून गेलेल्या मुलाच्या काळजीनं आता झोप येत नाही. अशा अवस्थेत पुण्यातील भवानी पेठेतील कासेवाडी झोपडीत जन्मलेल्या पण छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा म्होरक्या झालेल्या संतोष शेलारचे कुटुंब गरिबीत जीवन जगत आहे. कबीर कला मंचाने माथी भडकावल्याने तो घर सोडून गेला, असा आरोप शेलार कुटुंबाने केला.


पुण्यातील एका झोपडपट्टीत आठ बाय दहाच्या खोलीत हे कुटुंब राहते. घरात छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमा आहेत. विकास नावाचा धाकटा भाऊ एका शाळेत काम करतो.  वहिनी घरकाम करते. आई एका मंदिरात स्वयंपाक करते. मुलगा नक्षलवादी बनल्याचे ती मान्य करत नाही. नक्षलवादी झाल्याचा काय पुरावा, असा उलट जाब विचारते. पोलिस यंत्रणेच्या तपासाचे त्या माउलीला काही देणं-घेणं नाही. फक्त त्यानं घरी यावं, एवढा एकच धोशा तिनं लावलाय. 
 

 

कला मंचाचे लाेक इतर तरुणांना फूस लावतील 
संतोषचा थोरला भाऊ संदीप शेलार म्हणाला, “संताेष नववीत असताना आमच्या झोपडपट्टीत कबीर कला मंचाचा कार्यक्रम झाला. माझा धाकटा भाऊ त्यांच्यात सामील झाला. संतोष त्याच्या पथनाट्यात नव्हता, तरी शेजारी राहणाऱ्या रूपालीच्या संपर्कात होता अन् एके दिवशी बेपत्ता झाला. त्याला दहा वर्षे उलटून गेली. सचिन माळी व कबीर कला मंचाचे लोक टीव्हीवर मुलाखती देतात. पण संतोषबाबत हात वर करतात. ते असेच जामिनावर मोकाट राहिले तर आणखी तरुण गोळा करून पाठवतील. आम्ही तक्रार देण्यासाठी पुढं आलो. अनेकांची मुलं गायब आहेत.”

बातम्या आणखी आहेत...