आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंमत असेल तर काँग्रेसने काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करून दाखवावे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला राहुल गांधी आणि शरद पवार या नेत्यांनी केवळ राजकीय विरोध करू नये. हिंमत असेल तर या नेत्यांनी ३७० पुन्हा लागू करण्याचे आश्वासन द्यावे, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जाहीर सभांमधून दिले.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे या सभा पार पडल्या. यावेळी अमित शहा यांनी ३७० कलमाच्या मुद्द्यावर राहुल गांधी आणि शरद पवारांना लक्ष्य केले. कलम ३७० आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांचा संबंध काय? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या या नेत्यांनी इतिहास जाणून घेण्याची गरज आहे. ३७० कलमामुळे जम्मू-काश्मीर देशापासून वेगळे राहिले होते. काश्मिरात ४० हजारावर लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. त्यामुळे कलम हटवल्याने ते राज्य देशाचा हिस्सा होणार असेल तर त्याला विरोध का? केवळ राजकारणासाठी देशाची सुरक्षा धोक्यात का घालता, असा प्रश्न शहा यांनी या वेळी उपस्थित केला.

पाच वर्षात नक्षलमुक्तीचे लक्ष्य
नक्षलवादामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर भागाचा विकास होऊ शकला नाही. आम्हाला या भागात रस्ते, वीज, रेल्वेमार्ग आणायचे आहेत. नक्षलवाद्यांचा त्याला विरोध आहे. आम्ही मागील पाच वर्षात नक्षलवादी हिंसाचारावर अंकुश लावला. आता आगामी पाच वर्षात हा प्रदेश नक्षलमुक्त करण्याचे लक्ष्य असेल, असे शहा यांनी या वेळी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...