आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - ‘‘माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यास विरोध केला होता. मात्र, तेव्हा आम्ही त्यांची सूचना मनावर घेतली नाही. त्यांचे ऐकले असते तर आता राज्यपाल यांचे निधीवाटपासंदर्भात निर्देश घेण्याची वेळ आमच्यावर ओढावली नसती. त्याचप्रमाणे बाबरी मशीद पाडण्यापासून वाचवायची असेल तर कल्याणसिंग सरकार बरखास्त करावे, अशी सूचनाही चव्हाण यांनी केली होती. त्यावेळीही त्यांचे म्हणणे मानले असते तर जीवित हानी टळली असती”, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या चुकांची जाहीर कबुली दिली.
बुधवारी राज्य विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, कापूस एकाधिकार योजनेचे जनक यशवंतराव मोहिते, लोकनेते राजाराम बापू पाटील आणि विचारवंत रफिक झकेरिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे संस्मरण करण्यात आले. त्यात पवार बोलत होते. वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राने या कार्यक्रमाचे आयोजन केले हाेते.
“विधिमंडळ हे सौर्वभौम सभागृह आहे. वैधानिक विकास मंडळाची निर्मिती केल्यास निधी वाटपाचे अधिकार राज्यपालांकडे जातील, असे म्हणत शंकरराव चव्हाण यांनी माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत विकास मंडळांना विरोध दर्शवला होता. आम्ही त्यांचे ऐकले नाही. राज्यपाल यांचा अर्थसंकल्पातील नियतव्य वाटपातील सध्याचा हस्तक्षेप पाहता चव्हाण म्हणत होते ते बरोबर होते’’, अशी कबुली पवार यांनी दिली. “पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत बाबरी मशीदप्रकरणी समिती नेमली होती. मी त्या समितीत होताे. मशीद पाडण्यापासून वाचवायची असेल तर उत्तर प्रदेशचे तत्कालीन कल्याणसिंग सरकार बरखास्त करायला हवे, असे मत चव्हाण यांनी मांडले होते. पण, समितीने चव्हाणांचा निर्णय धुडकावला. चव्हाण यांचा निर्णय अप्रिय होता, पण त्यांचे मानले असते तर दंगलीतील जीवितहानी टळली असती’’, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.
आज सोलापूर जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक ३९ साखर कारखाने आहेत. ते उजनी धरणाने शक्य झाले. ते धरण शंकरराव यांनी बांधले. जायकवाडी धरण उभारण्याबाबत चव्हाणांशी मतभेद असल्याचे पवारांनी सांगतिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे चारही लोकनेते दीपस्तंभाप्रमाणे आहेत, असे सांगितले. काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी चौघा नेत्यांना स्वातंत्र्यलढ्याचा वारसा होता अशी मांडणी केली. ज्येष्ठ सनदी अधिकारी माधव गोडबोले प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत. माजी आमदार उल्हास पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
रफिक झकेरिया यांचे मोठे योगदान
पश्चिम महाराष्ट्रातील असूनही यशवंतराव मोहिते (भाऊ) यांनी कापूस खरेदी एकाधिकार योजनेत मोठे योगदान दिल्याचे पवारांनी आवर्जून नमूद केले. राजाराम बापू पाटील यांचा लोकांत थेट मिसळण्याचा गुण भावला. तर, रफिक झकेरिया यांच्यामुळे नागरी समस्यांची जाणीव तीव्र झाली, औरंगाबद व नवी मुंबईच्या विकासात झकेरिया यांचे योगदान मोठे असल्याचे पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे टोचले कान
मंत्रालयात आजकाल लोकांची इतकी गर्दी असते की मोर्चा आल्याचा भास होतो, त्यामुळे सरकारने प्रशासनाला अधिक वेळ दिला पाहिजे, या शब्दात शरद पवार यांनी व्यासपीठावर बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आपल्या भाषणात कान टोचले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.