आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक स्तरावर टिकायचे असेल गुणवत्ता हाच निकष : जावडेकर 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जागतिक स्तरावर स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर गुणवत्ता हाच एकमेव निकष आहे. पुढच्या काळात गुवत्तेच्या आधारेच विद्यापीठांना स्वायत्तता मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी येथे केले. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या २० व्या पदवीप्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

या वेळी जैन आचार्य विद्यासागरजी महामुनीराज यांना डी. लिट. ही मानद पदवी कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या वेळी कुलगुरू प्रा.डॉ. माणिकराव साळुंखे, प्र-कुलगुरू डॉ. विश्वजित कदम, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. विश्वास धापते, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन आणि विद्या परिषदेचे सदस्य उपस्थित होते. या समारंभात ६१२० विद्यार्थ्यांना पदवी, ५८ विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि ४४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रमुख पाहुणे, कुलपती आणि कुलगुरू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. 

 

जावडेकर म्हणाले की, 'भारताला समृद्ध अशी शैक्षणिक परंपरा लाभली आहे. पूर्वी येथील नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठात जगभरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत. याची आठवण आजच्या विद्यापीठांनी ठेवली पाहिजे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबरच गुणवत्तावाढीसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. पूर्वी ४८ हजार कोटी रुपये असलेला हा निधी सव्वा लाख कोटींपर्यंत वाढवला आहे. शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजऋण फेडण्यासाठी आणि राष्ट्राला उन्नत करण्यासाठी केला पाहिजे. काळाची पावले ओळखून अभ्यासक्रम सतत अद्ययावत केले पाहिजेत. बदल स्वीकारण्याची मानसिकता शिक्षण क्षेत्रात असली पाहिजे. आज डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून १ लाख ८० हजार ग्रंथ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. 
 

बातम्या आणखी आहेत...