आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा दिवसांत खड्डे बुजवले नाही तर पोत्यात घालून मारू: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज -  पाच  किलो मीटर अंतराच्या चंदनसावरगाव-जवळबन रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असतानाही केजच्या बांधकाम विभागाकडून ते बुजवले जात नसल्याने मंगळवारी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांच्या संतप्त भावना पाहता  बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता व गटविकास अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत खड्डे बुजवू असे लेखी पत्र देताच कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र १५  दिवसांत जर  खड्डे बुजवले नाहीत तर  अधिकाऱ्यांना पोत्यात टाकून चोप देण्याचे आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी दिला. 


चंदनसावरगाव-जवळबन या   पाच किलाे मीटर अंतराच्या रस्त्यावर ठिकठिकाणी  मोठे खड्डे  पडल्याने  पंधरा दिवसांपूर्वीच  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष  कुलदीप करपे यांनी   जि. प.च्या बांधकाम विभाग क्रमांक दोनच्या उपविभागीय कार्यालयास निवेदन देऊन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. परंतु  अधिकाऱ्यांनी निवदेनाची दखलच घेतली नाही. त्यामुळे करपे यांच्या  नेतृत्वाखाली  कार्यकर्त्यांनी  मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता बांधकाम क्रमांक दोन  उपविभागीय कार्यालयात  आंदोलन केले.   लिपिक  खांडेकर यांनी  तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोला, असे  आंदोलकांना सांगितले.

 

तेव्हा  करपे  यांनी बांधकाम विभागाचे  उपविभागीय अभियंता खेडकर यांना फोन करून रस्त्याची दुरुस्ती का  झाली नाही, अशी विचारणा केली तेव्हा खेडकर यांनी सदरील  रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत गेला आहे. आमच्याकडून या रस्त्यासाठी कोणताच  निधी देता येणार नाही असे  सांगितले.  बांधकाम विभागात  कोणताच जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने  आंदोलकांनी येथील  बांधकाम उपविभागाच्या कार्यालयास कुलूप ठोकले. त्यानंतर आंदोलक केजचे गटविकास अधिकारी रवींद्र  तुरुकमारे  यांच्या दालनात गेले. तेथे तुरुकमारे व करपे यांच्यात कार्यालयात प्रवेश केल्यावरून खडाजंगी झाली. जोपर्यंत बांधकाम विभागाचे अधिकारी बीडीओ कार्यालयात येत नाहीत तोपर्यंत या कार्यालयातून  उठणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. ही परिस्थिती पाहून गटविकास अधिकारी तुरुकमारे व बांधकाम विभागाचे लिपिक खांडेकर यांनी १५ दिवसांत रस्त्यावरील खड्डे बुजवू, असे लेखी पत्र कार्यकर्त्यांना दिले.

 

..तर अधिकाऱ्यांना चोप देणार : कुलदीप करपे 

केजचे गटविकास अधिकारी व बांधकाम विभागाने दिलेल्या पत्रावर स्वाभिमानी  शेतकरी  संघटनेने हे  आंदोलन आम्ही पंधरा दिवसासाठी आम्ही स्थगित करत आहोत. पण १५ दिवसांत  खड्डे बुजवले  नाहीत तर  सोळाव्या दिवशी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना पोत्यात घालून चोप दिला जाईल, असा इशारा करपे यांनी दिला. या आंदोलनात   कुलदीप करपेंसह उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ,मार्गदर्शक नितीन भाकरे पाटील, शाखाध्यक्ष  सुग्रीव करपे, उपाध्यक्ष दत्ता करपे, सचिव गोविंद करपे, संघटक अनिल करपे, गणू काका करपे, नवनाथ करपे, अभिमन्यू करपे, शरद भाकरे, दयानंद करपे, विक्रमराजे करपे, घरत, राऊत आदी सहभागी झाले होते.

 

खासदार शेट्टींच्या ताफ्यातील वाहने अडकली होती  
१० नोव्हेंबर रोजी केज तालुक्यातील जवळबन येथे खासदार राजू शेट्टी हे दुष्काळ निवारण व ऊस परिषदेसाठी संध्याकाळी सात वाजता चंदनसावरगाव ते जवळबन या मार्गावरून जात असताना  जवळबनहून चंदणसावरगावकडे जाणारी पिकअप  जवळबन येथील तळ्याच्या भरावावर खड्ड्यात अडकल्याने ताफा विस्कळीत होऊन वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...