आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत माेर्चा : १५ दिवसांत पीक विम्याची रक्कम न दिल्यास पेकाटात लाथ : उद्धव ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पीक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम १५ दिवसांच्या आत द्यावी, अशी आम्ही आजही हात जोडून विनंती करीत आहोत. त्याचप्रमाणे बँकांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम येत्या १५ दिवसांत अदा करून बँकेच्या बाहेर कर्जमुक्त केलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी लावावी. आज केवळ इशारा देण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका. परंतु १५ दिवसांत हे घडले नाही तर सोळाव्या दिवसापासून हा मोर्चा बोलायलाही लागेल आणि पेकाटात लाथ घातल्याशिवाय राहणार नाही,  असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिला. 


शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम कंपन्या देत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर शिवसेनेतर्फे बुधवारी मुंबईतील बीकेसी येथील भारती अॅक्सा विमा कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या अांदाेलनाचे नेतृत्व केले. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व मंत्री, नेते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  पुणे, परभणी, अकोला, सांगली, नागपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळाली नसल्याची तक्रार भारती अॅक्सा कंपनीला दिलेल्या निवेदनात उद्धव ठाकरे यांनी केली. ‘शेतकरी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पीक विम्याची रक्कम जमा केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला, परंतु त्यांना अजूनही भरपाई मिळालेली नाही.  ३१ जुलै २०१९ पर्यंत पीक विम्याची रक्कम अदा करावी आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती उलट टपाली द्यावी,’ असेही निवेदनात नमूद केलेे अाहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादीही निवेदनासोबत देण्यात आली.

 

हजाराे काेटी बुडवून उद्याेगपती फरार, शेतकरी मात्र कर्जाच्या ओझ्याखाली देहत्याग करतोय
‘माेदींनी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी  ७५ हजार कोटींची तरतूद केली. मुख्यमंत्र्यांंनीही राज्य सरकारने आपला पूर्ण निधी दिल्याचे सांगितले. कर्जमाफीसाठीही बँकांना २०-२२ हजार कोटींचा निधी दिला. आज नीरव मोदी, विजय मल्ल्यासारखे हजारो कोटींचे कर्ज बुडवून देश सोडून फरार झाले, पण छोटयाशा कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांनी देश नव्हे, तर देहत्याग केला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे मी उभा आहे  योजनांत काही त्रुटी असतील, काही मदत हवी असेल तर कंपन्या व बँकांनी जरूर सांगावे. सरकारसोबत बैठक करून त्या त्रुटी दूर करण्यास मी मदत करेन,’ असे आश्वासनही या वेळी उद्धव ठाकरे यांनी दिले.

 

उद्धव ठाकरे यांचे यापूर्वीचे मोर्चे
> २००७ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यूएलसीच्या मुद्द्यावर शिवसेना भवन ते वांद्रे येथील एमएमआरडीएच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता.
 

> जुलै २०११ ला गिरणी कामगार संघर्ष मोर्चातर्फे  निघालेल्या सर्वपक्षीय मोर्चात गिरणी कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबई बंदचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. या मोर्चात राज ठाकरेही होते. परंतु दोघेही अंतर ठेवूनच चालले होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...