मॅनेजमेंट फंडा / तीनचाकीचे स्वप्न असेल तर रिक्षाचे नव्हे, विमानाचे पाहा

मोठी स्वप्ने पाहा. कधीच हार मानू नका.

Sep 20,2019 09:46:00 AM IST

गुरुवारी गणेश चतुर्थी उत्सवादरम्यानची घटना. एका टेलर दुकानात माझी भेट माझ्या पेपरवाल्याशी झाली. त्याने मला नमस्कार केला. तीन सूट घेऊन तो दुकानाच्या बाहेर जाऊ लागला. त्याला पाहून मी चकित झालो. मी त्याला विचारले, ‘घरी कोणाचे लग्न आहे का?’ उत्तर ऐकून मी चाट पडलो. तो म्हणाला, ‘नाही सर. माझा मुलगा पुढच्या महिन्यात आयआयएम लखनाऊतून पदवीधर होईल. पुढच्या महिन्यापासून त्याचे कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू होतील. त्यासाठी मी हे सूट शिवले आहेत.’ माझ्या डोक्यात जुने विचार फिरू लागले. काही वर्षांपूर्वी त्याचा मुलगा माझ्या घरी पेपर टाकायला येत असे. तो आयआयएममधून गुगलमध्ये नोकरीसाठी शॉर्ट लिस्टेड झाला आहे. सर्व काही सुरळीत झाले तर पुढच्या महिन्यात त्याच्या हाती ऑफर लेटर असेल.


या घटनेने मला आणखी एक योद्धा नागपूरच्या श्रीकांत पंटावने यांची आठवण झाली. संकटाशी चार हात करून ते पुढे गेले. त्यांची कथा सुरू होते ती एका डिलिव्हरी बॉयच्या रूपात. ते एका सिक्युरिटी गार्डचे पुत्र. अनेक संकटे समोर आ वासून उभी. रोजच्या दैनंदिनीशी चार हात करणे आता नित्याचेच झाले होते. श्रीकांत यांनी कमी वयातच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी काम करणे सुरू केले. मात्र त्यांची स्वप्ने मोठी होती. काम आणि अभ्यासात त्यांनी एक संतुलन निर्माण केले. सामानाची डिलिव्हरी करून त्याचदरम्यान ते शाळेतही जायचे. त्यानंतर त्यांनी एक ऑटो खरेदी केला. ऑटोच्या तीन चाकांनी त्यांच्या आयुष्यालाही गती दिली. नागपूरच्या रस्त्यावर रिक्षा चालवणारा हा मुलगा २०१६ मध्ये वैमानिक बनला. इंडिगो एअरलाइन्समध्ये काम करू लागला.


एक दिवस नागपूर विमानतळावर सामान पोहोचवण्यासाठी गेलेल्या श्रीकांत यांच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आला. एक विमान लँड होण्याचा मोठा आवाज त्यांनी ऐकला. ते तेथेच थांबले. विमान रनवेवर शेवटपर्यंत जाईपर्यंत तसेच पार्किंगमधून परत येईपर्यंत तेथेच उभे राहिले. काही स्मार्ट लोकांना त्यांनी शानदार युनिफॉर्ममध्ये पाहिले. त्यांच्याबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. बाजूलाच असलेल्या चहाच्या हॉटेलात जाऊन तेथील लोकांना त्यांच्याबद्दल विचारले. ते लोक वैमानिक असल्याचे कळले. मात्र त्यांचा उत्साह लगेच मावळला. कारण, वैमानिकाचा कोर्स करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता ना शिक्षण. तरीही ते स्वत:शी म्हणाले, ‘एक दिवस जरूर मी वैमानिक बनेन.’ १२ वीनंतर आणखी एक परीक्षा द्यावी लागेल असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे डीजीसीएच्या माध्यमातून सरकारद्वारे मिळणारी शिष्यवृत्ती मिळू शकेल. त्यातून वैमानिक प्रशिक्षणाचा खर्च भागणार होता. या माहितीमुळे श्रीकांत यांचा उत्साह दुणावला. त्यांनी तयारी सुरू केली. दिवसभर रिक्षा चालवून रात्री ते परीक्षेची तयारी करत. कष्टामुळे २०११ मध्ये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. मध्य प्रदेशातील सागरच्या चाइम्स एव्हिएशन अकादमीत प्रवेश घेतला. इंग्रजी सुधारण्यासाठी मित्रांनी मदत केली. रात्री २ वाजेपर्यंत अभ्यास करून इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले. उत्तीर्ण झाल्यानंतर जणू गगनच ठेंगणे झाले. मात्र विमान उद्योगात परिस्थिती वाईट होती. ते नागपुरात नोकरी करू लागले. कामादरम्यान पुन्हा परीक्षा दिली. २०१३ मध्ये सेंट्रल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, हैदराबाद येथे निवड झाली. प्रशिक्षणानंतर इंडिगो एअरलाइन्समध्ये वैमानिक म्हणून निवड झाली.

फंडा असा : मोठी स्वप्ने पाहा. कधीच हार मानू नका.

X