आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपली दिशाभूल झाली असेल, तर ती स्वत:मुळेच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरविंद चोटिया

आयुष्याची वाटचाल करताना अनेकदा आपण अशा चौरस्त्यावर येऊन थांबतो, की नेमकं कुठे वळायचं ते आपल्याला माहीत नसतं. कोणत्या मार्गाने जाणे श्रेयस्कर आहे, हे आपण ठरवू शकत नाही. आपण स्वाभाविकपणे कुणा शहाण्याचा सल्ला घेतो, की आजवर या वाटेने इथपर्यंत आलो, आता पुढं कुठं जायचं ते सांगा! जिकडे गर्दी निघालीय, तिकडे आपण कधीही वळत नाही. गर्दीतून उभे राहून कुणी तिकडे जाऊ नका म्हणून ओरडले, तर आपण खरेच तसे करु असेही नाही. आधी आपण सगळी माहिती घेतो, की कुठे जाण्यात आपले हित आहे? जर आम्ही स्वत:विषयी इतके जागरूक आहोत, तर देशाच्या बाबतीत का नाही? देश आहे म्हणून आपण आहोत, हे आम्ही का लक्षात घेत नाही? बघा ना, देशात काय चाललेय..? रस्त्यांवर आक्रोश करणारी गर्दी दिसतेय, त्यातील कुणाही वीस लोकांना विचारा, की सीएए, एनआरसी आणि एनपीआरमध्ये काय फरक आहे? एकोणीस जणांना तो माहीत नाही, हे तुम्हाला कळेल. भाऊ, तुला विषय काय हेच माहीत नाही, तर मग हा गोंधळ कशाला..? ही घोषणाबाजी कशासाठी..? ही जाळपोळ कशाला..? देशातील बुद्धिजीवी ंनी याची चिंता केली पाहिजे, की तुम्ही आम्हाला हे काय शिकवताय असं विचारत लोक त्या तथाकथित नेते आणि कार्यकर्त्यांची कॉलर का पकडत नाहीत? जास्त नाही, पण इतकं नक्कीच होऊ शकतं, की लोकांना मुद्दा समजत नसेल, तर त्यांनी गप्प बसावं.

दुसरी गोष्ट म्हणजे, गर्दीतील कुणाला तुम्ही विचारा, की तुमच्यामुळे देशाच्या संपत्तीचे जे नुकसान होतेय, जगात आपली प्रतिमा खराब होतेय, याला कोण जबाबदार? तुम्हाला प्रत्युत्तर मिळेल, की याला जबाबदार तर पोलिस आहेत, सरकार आहे किंवा पंतप्रधान आहेत. तुम्हाला हेही ऐकायला मिळेल, की हिंसेला जबाबदार सरकार आहे, तर ती रोखू न शकण्यासाठीही सरकारच जबाबदार आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिशाभूल होणारे आम्ही आहोत आणि त्याला आपला मूर्खपणाच कारणीभूत आहे. पण, आपण ठामपणे म्हणतो, की याला जबाबदार कुणी दुसराच आहे. कटूसत्य हेच आहे की देशाला अशा दिशाभूलीपासून बाहेर काढावे लागेल. आपण पारतंत्र्यात नाही, तर स्वतंत्र भारतात राहतो, हे समजून घ्यावे लागेल. गुलामीतून बाहेर पडण्यासाठी केलेल्या विरोधाची पद्धत आता चालणार नाही. सगळा खेळ मतांचा आहे, ही बाब सुद्धा लोकांना समजली पाहिजे. नेतृत्व करणे म्हणजे लोकांना गोंधळात टाकणे नव्हे. सरकारमधील लोकांनीही विचार केला पाहिजे. त्यांनी हे आठवायला हवं, की जेव्हा आपण विरोधी पक्षात होतो, तेव्हा लोकांना गोंधळात टाकून विध्वंसक काम करत होतो की रचनात्मक..?

अरविंद चोटिया कार्यकारी संपादक, जोधपुर