Home | Maharashtra | Mumbai | If you want to work at home, change the job!

घरी बसून काम करायचे असल्यास नोकरी बदलू! जॉब फर्म 'इनडीड' च्या पाहणीत निम्म्या कर्मचाऱ्यांनी दर्शवली तयारी 

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Feb 13, 2019, 09:49 AM IST

अनेक कंपन्याचे कुशल कर्मचाऱ्यांसाठी नवे धोरण 

 • If you want to work at home, change the job!

  मुंबई- कार्यालयात न जाता घरी बसून काम करण्याचा पर्याय मिळाल्यास सुमारे निम्मे नागरिक नोकरी बदलण्यास तयार असल्याचे एका पाहणीतून समोर आले आहे. नोकऱ्यांसंदर्भातील संस्था 'इनडीड' ने ही पाहणी केली आहे. त्यात ४८ % कर्मचाऱ्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली. घरी बसून काम (रिमोट वर्किंग) करण्याची सुविधा नसलेल्या कंपन्यांतील ७३ % कर्मचाऱ्यांनी असा पर्याय मिळण्याची इच्छा दर्शवली. तसेच असा पर्याय मिळाल्यास कमी वेतन घेण्यासही तयार असल्याचे ५३ % व अशा नोकरीचा शोध सुरू केल्याचे ४२ % कर्मचाऱ्यांनी सांगितले.

  इनडीडच्या ब्रिटनमधील सेन्ससवाइड कन्सल्टन्सीने यासाठी ५०१ कंपन्यांतील हजार कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यात एचआर, आयटी, टेलिकॉम, फायनान्स, सेल्स, मीडिया अंॅड मार्केटिंग, रिटेल, केटरिंग, हेल्थकेअर, युटिलिटीज, ट्रॅव्हल-ट्रान्सपोर्ट आदी क्षेत्रांतील कंपन्यांचा समावेश होता. अनेक कंपन्या कुशल कर्मचारी आपल्याकडे राहावेत म्हणून रिमोट 'वर्किंग धोरण' स्वीकारत आहेत. या पाहणीत सहभागी ९० % कंपन्यांनी सांगितले की, हे धोरण सोपे करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, लॅपटॉप, स्मार्टफोन आदी बाबी खरेदी करण्यासाठी गुंतवणूक केली आहे.

  तथापि, हे धोरण स्वीकारण्यात तंत्रज्ञानात गुंतवणूक हाच मोठा अडथळा असल्याचे ४७ % कंपन्यांचे म्हणणे आहे. तरीही ८३ % कंपन्यांच्या मते 'रिमोट वर्किंग' धोरणामुळे कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढते. दरम्यान, हे धोरण योग्यरीत्या राबवले गेल्यास प्रतिभावंत कर्मचाऱ्यांना आकर्षिक करण्याचे एक चांगले माध्यम बनू शकते, असेही या अहवालात म्हटले आहे.

  घरून काम करण्याचे हे सांगितले फायदे
  - घरून काम केल्यास कार्यालय व घर दोघांत चांगला समन्वय साधता येईल.
  - यामुळे तणाव कमी होऊन उत्साह वाढेल. या धोरणाकडे कल असलेल्यांत तरुणांची संख्या जास्त आहे.
  - लवचीकता आल्याने काम अधिक चांगले करू शकू, असे ५६ % कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Trending