आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट निर्मिती बनणार भारत-रशियात सेतू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रशियन साहित्य पुरेशा प्रमाणात भारतात पोहोचत नाही कुद्शेव्ह यांची खंत
  • रशियाचे राजदूत निकोलाय कुद्‌शेव्ह यांचा आशावाद

​​​​​​​पणजी : संयुक्त चित्रपट निर्मिती आणि चित्रपटांच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाण-घेवाण यामुळे भारत आणि रशियाचा आत्मा जोडला जाईल, असे रशियाचे भारतातील राजदूत निकोलाय कुद्‌शेव्ह यांनी सांगितले. रशियातल्या व्लादिवोस्टोक इथे सप्टेंबर २०१९ मध्ये दोन्ही देशांदरम्यानच्या सांस्कृतिक संबंधांचा अधिक विस्तार करण्याबाबत संयुक्त करार करण्यात आला. या कराराचा फायदा घेऊन एकत्रित काम करून संयुक्त लक्ष्य साध्य करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले. निकोलाय कुद्‌शेव्ह हे ५० व्या इफ्फी चित्रपट महोत्सवादरम्यान पत्रकार परिषदेत बोलत होते.

समकालीन रशियन साहित्य पुरेशा प्रमाणात भारतात पोहोचत नाही, असे कुद्‌शेव्ह यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ही दरी भरून काढण्यासाठी १० सर्वोत्तम रशियन पुस्तके हिंदीत आणि १० सर्वोत्तम भारतीय पुस्तके रशियन भाषेत भाषांतरित करण्याची सरकारची योजना आहे, असे ते म्हणाले. शिक्षण क्षेत्रातही अधिक सहकार्य आणि आदान-प्रदान वृद्धिंगत करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांदरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी रशिया कटिबद्ध असल्याचे ते या वेळी म्हणाले. रशियात एक भारतीय दूरचित्रवाणी चॅनल कार्यरत असून, त्यावर भारतीय चित्रपट पाहता येतात, असेही त्यांनी सांगितले.

सुवर्णमहोत्सवी इफ्फीमध्ये रशियाची भागीदार देश म्हणून निवड केल्याबद्दल त्यांनी केंद्र आणि गोवा सरकारचे आभार मानले.


भारतीयांमध्ये रशियन चित्रपटांबद्दल मोठी उत्सुकता आहे, असे इफ्फीमधील रशियाच्या शिष्टमंडळाच्या प्रमुख आणि किनोरिपोर्टरच्या संपादिका मारिया लामशेव्ह म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त रशियातील चित्रपट इफ्फीमध्ये फोकस कंट्री सदरात दाखवण्यात येत आहेत. ॲबगेलसारख्या चित्रपटात तरुणाईचे स्वप्नरंजन दाखवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सहनिर्मितीबाबत झालेल्या करारानुसार चित्रपटाच्या अर्थसंकल्पापैकी ४० टक्के रक्कम सांस्कृतिक मंत्रालयातर्फे परत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 'ॲबगेल' मधील अभिनेता ग्लीब बोकचेव्ह हेदेखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. भविष्यात भारतीय चित्रपटात काम करण्याची इच्छाही कलाकारांनी व्यक्त केली.

 

बातम्या आणखी आहेत...