आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकरंद अनासपुरे म्हणाले, नाट्यगृहांचा वापर मराठी चित्रपटांसाठी करावा, पर्रीकरांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय..!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी (नितीश गोवंडे) : मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात चित्रपटगृह मिळत नाहीत, ही खेदाची बाब आहे. पण यावर उपाय म्हणून राज्यातील जी नाट्यगृहे आहेत, त्यांचा वापर मराठी चित्रपट दाखवण्यासाठी करता येऊ शकतो. आपल्याकडे नाटकांचे प्रयोग शक्यतो रात्रीच असतात. काही शहरात नाट्यगृहे आहेत पण महिन्या सहा महिन्यात एखादा नाटकाचा प्रयोग होतो. अशा वेळी दिवसभर मराठी चित्रपट या नाट्यगृहात दाखवले गेले तर मराठी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग वाढेल, तिकीट दर देखील चित्रपट गृहांपेक्षा कमी असेल, याचा फायदा प्रेक्षकांना होईल, असे मत प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले.


सुवर्णमहोत्सवी इफ्फी विषयी काय वाटते, या प्रश्‍नावर ते म्हणाले, इफ्फीला येण्यास साधारण 2012 पासून सुरुवात केली. इप्फीचे बदलते स्वरुप मी जवळून अनुभवले. यावर्षी या महोत्सवाची कीर्ती आणखीन वाढली असून, भारतीय रसिकांना वेध लागतात ते नोव्हेंबरमध्ये प्रत्येक वर्षी होणाऱ्या इफ्फीचे. सर्व राज्यांतून बरेच प्रेक्षक गोव्यात दाखल होतात. या महोत्सवामुळे प्रादेशिक चित्रपटांना बळकटी मिळते. येथे निकोप स्पर्धा आहे. 'डॅनियल' सारखा चित्रपट अमेरिकेत दाखवला नाही तो येथे दाखवला जात आहे. डॅनियल रे एका छायाचित्रपत्रकाराची थरारक गोष्ट असून, इसिसच्या दहशतवाद्यांनी त्याचे केलेले अपहरण आणि ते 13 दिवस या कथेवर हा चित्रपट आहे. तसेच 'दे धक्का' या चित्रपटाचा सिक्वेल करत आहे. लंडनमध्ये याच्या एका टप्प्यातील चित्रिकरण पूर्ण झाले. पुढील वर्षी जानेवारीत प्रदर्शित होणार असल्याचे ते म्हणाले.

  • पर्रीकरांची उणीव प्रकर्षाने जाणवतेय..!

महोत्सवानिमित्त पर्रीकरांशी आलेल्या संबंधाविषयी सांगतांना अनासपुरे म्हणाले, मनोहर पर्रीकरांचे जाणे फार अकस्मात होते. अतिशय अभ्यासू, विद्वान आणि पाय जमिनीवर असणारा माणूस म्हणून मला त्यांच्याविषयी आपुलकी आहे, त्यांची पोकळी सर्वांनाच आहे. एका बाजूला मोठा संरक्षकांचा ताफा घेऊन फिरणारे राजकारणी आपण पाहतो आणि लग्नात वधू-वरांना भेटण्यासाठी रांगेत उभे असणारे पर्रीकर बघतो, तेव्हा त्यांच्याविषयीचा आदर आणखी वाढतो. त्यांची कमी आहेच, कारण कोणत्याही थोर माणसाची कमीही जाणवतेच.

  • ऑस्करपर्यंत जाणे महत्त्वाचे...

भारतीय चित्रपट ऑस्करपर्यंत जातात आणि ते पुरस्कार मिळवू शकत नाहीत, अशी काही मोठ्या निर्माते, दिग्दर्शकांची खंत आहे. याविषयी अनासपुरे म्हणाले की, तसे म्हणता येणार नाही कारण आपल्याला चित्रपटांचे मार्केटिंग करता येत नाही किंवा आपण त्यासाठी कमी पडतोय. ऑस्करसाठी पाच हजार ज्युरी चित्रपट पाहतात, त्यांच्यापर्यंत चित्रपट पोहोचवणे खर्चिक काम आहे. कारण एका अमेरिकन डॉलरसाठी आपले 70 रुपये मोजावे लागतात. याशिवाय मोठ्या प्रमाणात चित्रपटासाठी गुंतवणूक करावी लागेल.  

बातम्या आणखी आहेत...