आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पणजी : स्त्रीभ्रूण हत्या हा सध्या एक संवेदनशील विषय बनला आहे. मध्यंतरी महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रासह, विदर्भ आणि मराठवाड्याचा भाग स्त्रीभ्रूण हत्येच्या प्रकरामुळे बराच चर्चेत आला होता. एकापाठोपाठ एक अनेक रुग्णालयांना या वेळी टाळे लागले. स्त्रीभ्रूण हत्येच्या घटना जोरदार चर्चेत होत्या. त्यानंतर केंद्र सरकारला आणि राज्य सरकारलाही स्त्रीभ्रूण हत्येविरोधात कडक कारवाई आणि लिंग तपासणीच्या चाचण्यांना बंदी घालावी लागली. याच विषयाला एक डॉक्टर म्हणून हाती घेत डॉ. अजित वाडीकर यांनी 'वाय' या सिनेमाच्या माध्यमातून स्रीभ्रूण हत्येचा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या फिल्म बाझारमध्ये रिकमेंड या झालेल्या या सिनेमाच्या क्लिपिंगनंतर चित्रपटाविषयी वाडिकर यांच्याशी 'दिव्य मराठी' ने संवाद साधला.
मागील महिन्यात मुंबई येथे पार पडलेल्या 'मामी' चित्रपट महोत्सवात 'वाय' चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद चर्चेचा विषय ठरला. स्रीभ्रूण हत्येसारखा विषय, त्याचबरोबर त्यामागील डॉक्टरांचा पैसा कमवण्याचा उद्देश हा विषय अनेक वर्षे डॉ. वाडिकर यांच्या मनात घोळत होता. वैद्यकीय क्षेत्राशी जोडलेल्या डॉ. वाडिकर यांनी धुळ्यात एचआयव्ही रुग्णांच्या तपासणीसाठी राबवल्या जाणाऱ्या मोहिमा पार पाडल्या. तसा थेट उपचार करण्याची त्यांच्यावर कधी वेळ आली नाही, पण चित्रपट पाहणे हा छंद त्यांना चित्रपट निर्मितीकडे घेऊन गेल्याचे त्यांच्या एकंदर सांगण्यावरून स्पष्ट झाले.
चित्रपट पाहत असताना अमेरिकन चित्रपट निर्माता रॉबर्ट रॉड्रिग्स यांची कथा वाचताना १९९० मध्ये त्यांनी केवळ ७ हजार अमेरिकन डॉलर खर्चुन 'अल मेरीची' हा चित्रपट बनवला आणि लाखो डॉलर त्यावर कमवले. पैशापेक्षा त्यांची आत्मकथा फारच भावली आणि त्यात त्या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, संगीत, एडिटिंग एवढी सगळी कामे त्या व्यक्तीने केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यातून मी फारच उत्साहीत झालो. त्यानंतर चित्रपटाशी संबंधित सर्व बाबींचे मी वाचन करू लागलो. काम करताना वेळ मिळेल, तसे वाचन करण्याची मला सवय आहे त्यामुळे माझे ज्ञान वाढले आणि मित्राने दिलेल्या सल्ल्यामुळे चित्रपट क्षेत्राकडे वळलो. वैद्यकीय क्षेत्राशी संबंध असलेला विषय घेऊन चित्रपट काढायचा असे निश्चित केले. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला.
स्त्रीभ्रूण हत्या हा विषय एक डॉक्टर म्हणून मांडताना, या पेशा स्वीकारलेल्या लोकांकडे संशयाने पाहिले जाते. या विषयावर डॉ. वाडीकर म्हणतात, ९९ टक्के डॉक्टर या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करतात. एखाद्या टक्क्यामुळे सर्वांकडे संशयाने पाहणे योग्य नाही. चित्रपट निर्माण करताना घरातील प्रत्येक व्यक्तीचा पाठिंबा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. लातूर, उद्गीर तालुक्यात आणि २० टक्के भाग हा पुण्यात शूट करण्यात आला आहे. या चित्रपटासाठी कलाकारांची निवड करताना मुक्ता बर्वेला मुख्य भूमिकेत घेण्याचे ठरले होते. 'वाय' हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येईल, असा विश्वास डॉ. वाडिकर यांनी व्यक्त केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.