आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थपूर्ण चित्रचौकटींचा सोहळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट ही आधुनिक कला मानली जाते. या कलेचे अनेक बाबतीत तांत्रिक-यांत्रिक अवलंबित्व असते, हे खरे असले तरी ही तांत्रिक-यांत्रिक सामग्री हाताळणारे 'कलावंत'च असतात आणि यामुळेच चित्रपट ही 'अभिजात कला' या संज्ञेत समाविष्ट होते. याच अर्थाने आपण 'क्लासिक' या इंग्रजी संज्ञेचा समानार्थ 'अभिजात' असा केला आहे. चित्रपट ही जशी आधुनिक कला आहे, तशीच ती संकीर्ण कला आहे. चित्रपटात साहित्य, गायन, वादन, नर्तन, चित्र, शिल्प, रंगभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना. यांच्या जोडीने कॅमेरा आणि नंतर एडिटिंग डेस्क यांचाही समावेश असतो. त्यामुळे चित्रपट अनेक कलाप्रकारांना सामावून घेणारी संकीर्ण कला ठरते. एखादा गायक फक्त तानपुऱ्याच्या सोबतीने मैफल रंगवू शकतो, तसे चित्रपटाच्या बाबतीत शक्य नसते. चित्रपट हे अनेक कलाप्रकार आणि कलावंतांचे टीमवर्क असते. गोव्यात पणजी येथे नुकत्याच सुरू झालेल्या 'इफ्फी' (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया) च्या माध्यमातून जगभरातील चित्रपटांचे असे टीमवर्क अनुभवास येत आहे. कृष्णधवल काळातील स्मृतिरम्य वातावरणात नेणारा 'ऑस्कर रेस्टोस्पेक्टिव्ह' हे इफ्फीचे मोठे आकर्षण तर आहेच, पण इफ्फीचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने जगभरातील दिग्दर्शक, कलाकार, कलासमीक्षक यांची मांदियाळीच जमली आहे. वेगवेगळ्या देशांच्या, निरनिराळ्या संस्कृती दर्शवणाऱ्या 'वर्ल्ड सिनेमा' विभागात तब्बल दोनशे निवडक विदेशी चित्रपटांचा खजिना आहे. 'इंडियन पॅनोरमा' विभागात देशाच्या कानाकोपऱ्यांतून निवडलेले उत्तम चित्रपट आहेतच, पण मराठी मनाला अभिमान वाटावा अशी गोष्ट म्हणजे या विभागात तब्बल सहा मराठी चित्रपटांचा समावेश आहे. अन्य कुठल्याही भारतीय भाषेतले इतके चित्रपट या विभागात नाहीत. त्यामुळे एकूणच मराठी चित्रपट दिग्दर्शकांची विषयांची निवड, हाताळणी आणि मांडलेला आशय, यातील दर्जेदारपणा लक्षात यावा. बुजुर्ग दिग्दर्शकांच्या जोडीने अनेक युवा प्रतिभेचे दिग्दर्शकही प्रेक्षकांची दाद मिळवत आहेत. 'फिल्म बझार'मध्ये जागतिक व्यासपीठावर आपल्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्याची संधी नव्या निर्मात्यांना मिळत आहे. पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे आगळेवेगळे प्रदर्शन इफ्फीमध्ये लक्षवेधक ठरत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पणजी हे इफ्फीचे कायमस्वरूपी केंद्र झाल्यापासून गोव्यातील चित्रपट साक्षरता लक्षणीय वाढली आहे. एकच मल्टिप्लेक्स असणाऱ्या गोव्यात चित्रपटगृहे उभारली गेली, फिल्म क्लब चळवळ जोम धरते आहे. कोकणी चित्रपटही मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. नवे विद्यार्थी दिग्दर्शक घडत आहेत आणि त्यांना भावणारे विषय लघुपटांच्या आणि चित्रपटांच्या माध्यमातून मांडत आहेत. ज्या भोवतालात नवी पिढी वावरते आहे, जे अनुभव घेते आहे, ज्या आव्हानांना सामोरी जात आहे, ज्या समस्या त्यांना सतावत आहेत, त्या मांडण्याचे, सोडवण्याचे, प्रश्न निर्माण करण्याचे एक सशक्त माध्यम त्यांना चित्रपटाच्या रूपाने गवसले आहे. हे माध्यम हाताळण्याच्या विविध पद्धतींचा मागोवा घेत नवी पिढी नव्या आशयाची चित्रपटनिर्मिती करत असल्याचा विश्वास इफ्फीच्या निमित्ताने मिळत आहे.  

बातम्या आणखी आहेत...