आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इफ्फी : चित्रानुभवांची लयलूट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

यशोधरा काटकर  

२० ते २८ नोव्हेंबरदरम्यानं पणजी इथं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. देशोदेशीच्या चित्रपटानुभवांची मेजवानी, नवोन्मेषाला प्रोत्साहन, कोकणी चित्रपटांचा पहिल्यांदाच स्वतंत्र ‌विभाग अशा अनेकविध वैशिष्ट्यांनी यंदाचा महोत्सव वेगळा ठरतो आहे. महोत्सवाचा हा ‘आँखों देखा’...   
भारतीय चित्रपट जगात मानाचे स्थान मिळवलेल्या ५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘इफ्फी’ ची सुरुवात २० नोव्हेंबरला थाटामाटात झाली. या वर्षीच्या महोत्सवात ‘इंटरनॅशनल कॉम्पिटिशन’, ‘वर्ल्ड पॅनोरामा’, ‘सोल ऑफ आशिया’, ‘ इंडियन पॅनोरामा’,’फेस्टिव्हल कॅलिडोस्कोप’, यासह  डॉक्युमेंट्रीज, शॉर्टफिल्म, अॅनिमेशन असे विविध  विभाग आहेत. शिवाय  दिग्गज चित्रकर्मींच्या  चित्रपटांचे पुनरावलोकन  घडवणारा  ‘रिट्रोस्पेक्टिव्ह’, चित्रपटक्षेत्रात नवनवे प्रयोग  करणाऱ्या   देशावर ‘कंट्री फोकस’, चित्रपटाच्या तांत्रिक अंगांबद्दल  चर्चासत्रे आणि कार्यशाळा, पस्तीस  ‘मास्टर  क्लास’  असा  ऐवज घेऊन या वर्षीचा ‘इफ्फी’ अवतरला आहे . 
 
 

वैविध्यपूर्ण चित्रानुभव :


यंदाच्या महोत्सवाचं  उद‌‌घाटन गोरान पास्कलविक्स  दिग्दर्शित-’ डिस्पाइट  द फॉग ‘ या फ्रेंच चित्रपटाने झालं. अली नामक  निर्वासित, अनाथ मुलाला  एक इटालियन जोडपे आपल्या कुटुंबात सामावून घेऊ पाहते, त्यातून उद्भवणाऱ्या उलाघालींची कहाणी म्हणजेच, ‘डिस्पाइट  द फॉग’. प्रसिद्ध  इराणी दिग्दर्शक मोहसीन मखमलबाफ यांच्या, ‘मार्घ  अँड  हर मदर’ नं महोत्सवाचा समारोप होणार आहे. घर सोडण्याची  नोटीस मिळाल्याने आईपासून दुरावत परक्या घरात आसरा घ्याव्या लागलेल्या लहानग्या मुलीचे उलगडलेले भावविश्व हे ‘मार्घ  अँड हर मदर’चं कथानक. संपूर्ण महोत्सवात उलगडत जाणारा  वैविध्यपूर्ण कलात्मक चित्रपटांचा खजिना आणि मोहसीन मखमलबाफसारख्या  नामांकित दिग्दर्शकाच्या इराणी चित्रपटाने  होणारी सांगता  यामुळे अगदी शेवटच्या चित्रपटापर्यंत  वैविध्यपूर्ण चित्रानुभवांची  लयलूट या वर्षीच्या  ‘इफ्फी’  मध्ये होते आहे. या वर्षी  या महोत्सवात जगभरातल्या तब्बल ७६  देशांतल्या २०० चित्रपटांचा आणि भारतीय ‘पॅनोरामा’ विभागात २६ चित्रपट आणि १५ लघुपटांचा समावेश केला गेलाय. या वर्षीचा ‘इफ्फी’ गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक व्यापक आणि वैविध्यपूर्ण आहे. तसेच अतिशय स्पर्धात्मक वातावरणात तो पार पडत आहे. या वर्षी ‘कंट्री फोकस’ मध्ये रशियाचे आठ उत्कृष्ट चित्रपट झळकले. जागतिक सिनेमाची परिभाषा बदलून टाकत काळाच्या पडद्यावर आपला अमीट ठसा  उमटवणाऱ्या आंद्रे तार्कोव्हस्की या रशियन लेखक-दिग्दर्शकाच्या जीवनप्रवासावर काढलेल्या ‘आंद्रे तार्कोव्हस्की - ए सिनेमा प्रेयर‘ या माहितीपटाचा यात समावेश आहे. मास्टरपीस म्हणून नावाजल्या गेलेल्या या  माहितीपटासाठी तार्कोव्हस्कीसाठी जीव टाकणाऱ्या चाहत्यांची आणि विद्यार्थ्यांची गर्दी झाली आहे.  ‘रिट्रोस्पेक्टिव्ह’ मध्ये केन लोश या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्दर्शकाचा भांडवलशाहीवर भाष्य करणारा अगदी अलीकडचा ‘सॉरी, वी मिस्ड यू' तसेच अतिशय नावाजलेला अविस्मरणीय चित्रपट   ‘आय, डॅनियल ब्लेक’ आणि ‘रेनिन्ग स्टोरीज' ‘स्वीट सिक्स्टीन’, फादरलँड,’ “रिफ-रॅफ’ हे चित्रपट दाखवले जात आहेत.  महिला दिग्दर्शकांची खास दखल घेण्यासाठी जगभरातल्या तब्बल ५०  दिग्दर्शिकांचे चित्रपट  ‘वर्ल्ड पॅनोरामा ‘मध्ये शोकेस केले जाणार आहेत, यातले ‘गॉड एक्झिस्टस-हर नेम इज पेट्रूनिया’, ३७ सेकंड्स,’ पोर्टेट ऑफ अ लेडी ऑन फायर’ हे अगदी बघायलाच हवेत असे काही चित्रपट. गेल्या ५० वर्षांत ‘इफ्फी’मध्ये सुवर्णमयूराचे  मानकरी ठरलेले  चित्रपट ‘गोल्डन पीकॉक  रिट्रोस्पेक्टिव्ह’मध्ये आणि ५० वर्षे पूर्ण करणारे अभिजात भारतीय चित्रपट ‘गोल्डन लायनिंग’ विभागात दाखवले जात आहेत.

बॉलीवूडचा दबदबा :  


या वर्षी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना मिळालेला दादासाहेब फाळके पुरस्कार आणि  ६६ व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बॉलीवूडमधल्या चित्रपटांनी मारलेली बाजी बघता  ‘इफ्फी’ मध्येही त्यांची छाप ठळकपणे उमटली आहे. 

 
या वर्षी  ‘बधाई हो’ सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपटासाठी सुवर्णकमळाचा  तर ‘पॅडमॅन’
सामाजिक आशय मांडणाऱ्या चित्रपटासाठी रजतकमळाचा मानकरी ठरला. ‘उरी -द सर्जिकल स्ट्राइक ’, ‘अंधाधुन ’, ‘पद्मावत ’ हेही राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरले. गंभीर प्रकृतीच्या समांतर  प्रवाहातल्या चित्रपटांच्या जोडीने बॉलीवूडच्या प्रमुख प्रवाहातले चित्रपट या वर्षी राष्ट्रीय पुरस्कारात बाजी मारून गेले. म्हणून या वर्षी ‘इफ्फी’त देशोदेशींच्या रंगकर्मींच्या वैविध्यपूर्ण कलाकृतींबरोबर अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे मानदंड असणारे चित्रपट शिवाय  ‘उरी’, ‘अंधाधुन’, ‘बधाई हो’ ,‘सुपर ३०’ तसेच ऑस्करच्या स्पर्धेतला झोया अख्तरचा  ‘गली बॉय’ अशा हिंदी चित्रपटांनीही हजेरी लावली. गेल्या वर्षात आपल्याला सोडून गेलेले दिग्गज रंगकर्मी - कला इतिहासकार विजया मुळे, संगीतकार खय्याम, दिग्दर्शक राजकुमार बडजात्या, बंगाली अभिनेत्री रुमा गुहा-ठाकुर्ता, अभिनेत्री विद्या सिन्हा, दिग्दर्शक मृणाल सेन, आसामी अभिनेते बिजू फोकन, आसामी दिग्दर्शक मुनीन बरुआ, लेखक -अभिनेते मोहन रंगाचारी, छायाचित्रणकार राधाकृष्णन आदी रंगकर्मींना ‘होमेज’ विभागात त्यांचे चित्रपट सादर करून आदरांजली वाहण्यात आली.

नवोदितांना प्रोत्साहन :


जागतिक स्तरावरच्या नव्या रंगकर्मींच्या अभिनव प्रयोगांची दखल घेण्यासाठी ‘इफ्फी’ मध्ये डेब्यू डायरेक्टर कॉम्पिटिशन’ आयोजण्यात आली. अमीन सिदी-ब्युमेडीन (‘अबू लैला’-अल्जेरिया),  ली चांग-जॉन जोन(‘रोमांग’-कोरिया),  मॉरीस ओल्टीन (‘मॉन्स्टर्स’- रोमानिया) स्टीव्हन ओरीट(‘माय नेम इज सारा’- अमेरिका) ,  इव्हा कूल्स ( क्लियो - बेल्जियम) आणि मनु अशोकन  (मल्याळम-‘उयारे’)बरोबर अभिषेक शाह (राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता  गुजराथी ‘हेल्लारो’)हे दिग्दर्शक या स्पर्धेत अटीतटीने उतरले आहेत. ‘हेलारो’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे प्रेक्षकांची गर्दी तिथे खेचली जाणार आहे पण अल्जेरिया ते अमेरिका हा भौगोलिक - राजकीय अवकाश पाहता तिथल्या तरुणाईच्या या समकालीन चित्रपटांबद्दल उत्सुकता आहेच.
 
 

कोकणी चित्रपटांचा विभाग पहिल्यांदाच : 


२००४ साली गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांनी हा महोत्सव मोठ्या हिकमतीने गोव्याकडे खेचून आणला. अद्ययावत चित्रपटगृह आणि इतर पायाभूत सुविधा युद्धपातळीवर उभारल्या. शिस्तबद्ध नियोजनातून पहिला चित्रपट महोत्सव यशस्वी करून दाखवला. या वर्षी त्यांची अनुपस्थिती मनाला  चटका लावतेय. गोमंतभूमी हे अनेक कलांचे समृद्ध माहेरघर. गेली तब्बल पंधरा वर्षे ‘इफ्फी’ इथे स्थिरावला आहे. तरी गोव्यात चित्रपटव्यवसायाचे स्वरूप फारसे विकसित झालेले नव्हते. ‘इफ्फी’ मध्येही त्यांचे प्रतिबिंब उमटत नव्हते म्हणून एक नाराजीचा सूर होता. पण या वर्षी मात्र  ‘द  गोवन  स्टोरी’ या खास विभागाची योजना करून गोव्यात निर्माण झालेल्या पारितोषिक प्राप्त कोकणी  चित्रपटांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले गेलं. या विभागात राजीव शिंदे दिग्दर्शित (के सेरा सेरा), ज्ञानेश मोघे (दिगंत), राजेंद्र तालक (ए रेनी डे), दिनेश भोसले (आमोरी), मिरांशा नाईक (जुझे), लक्ष्मीकांत शेटगावकर (पैलताडाचो मुनीस) आणि नितीन सुपेकरचा (बडे अब्बू) हे चित्रपटांचं प्रदर्शन ठेवण्यात आलंय. यातल्या अगदी अलीकडच्या ‘बडे अब्बू’ने झारखंडच्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  महत्त्वाच्या पुरस्कारांवर गोमंतकीय मुद्रा कोरली. सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट संकलन अशी चार पारितोषिके ‘बडे अब्बू’ने पटकावली. आदित्य सुहास जांभळेच्या ‘खरवस‘ या मराठी लघुचित्रपटाने आणि ‘आमोरी‘ने राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. महोत्सवातल्या चित्रपटांपासून स्फूर्ती घेतलेले असे अनेक रंगकर्मी केवळ गोव्यातच नव्हे तर इतरत्रही पुढे यावेत. गोव्याचे सुपुत्र स्व. मनोहर पर्रीकरांना तीच खरी आदरांजली ठरेल.़

लेखिकेचा संपर्क :  ९८२११४४८८१

बातम्या आणखी आहेत...