आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापणजी : ५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा गुरुवारी डोना पावला येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडिअमवर समारोप झाला. या वेळी ब्लेझ हॅरिसन दिग्दर्शित आणि एस्टेल फियालॉन निर्मित 'पार्टीकल्स' या चित्रपटाने इफ्फी महोत्सवाचा प्रतिष्ठेचा 'सुवर्ण मयूर' पुरस्कार पटकावला आहे. ४० लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून निर्माता आणि दिग्दर्शक अशा दोघांचा या पुरस्कारात समान वाटा आहे. पौंगाडावस्थेतील मुलांचा प्रवास आणि त्यायोगे भौतिकशास्त्राच्या मदतीने पलिकडच्या जगाचा शोध घेण्याचा त्यांच्या प्रवासाचे चित्रण या चित्रपटात आहे. संयत चित्रांकनासाठी या चित्रपटाचे परीक्षक मंडळाने विशेष कौतुक केले.
या समारोपावेळी गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, खासदार रवी किशन, रूपा गांगुली, प्रेम चोप्रा, दिग्दर्शक रोहित शेट्टी, रकुल प्रीत सिंग, वर्षा उसगावकर, सुभाष घई, रमेश सिप्पी, हरिहरन यांच्यासह अन्य चित्रपट सृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती होती. या वेळी राज्यपाल मलिक यांनी मी याआधी कधीही गोव्याला आलेलो नव्हतो, पण गोवा ज्या ४-५ कारणांसाठी ओळखले जाते त्यात 'इफ्फी'चा समावेश होतो आणि ५० व्या इफ्फीच्या समराेपावेळी मी इथे आहे ही माझ्यासाठी आनंदाची बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यानंतर पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात 'जल्लिकट्टू' या चित्रपटासाठी लिजो जोस पेल्लिसेरी यांनी सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला. या पुरस्काराचे स्वरूप रौप्य मयूर, प्रशस्तीपत्र आणि १५ लाख रुपये असे आहे. हा मल्याळम चित्रपट असून, दुर्गम गावातील एक बैल गावातून पळून जातो आणि त्यातून हिंसा उद्भवते, असे या चित्रपटाचे कथानक आहे. या चित्रपटातील 'कोरिओग्राफीचे' परीक्षक मंडळाने कौतुक केले.
विशेष ज्युरी पुरस्कार पेमा त्सेदेन यांच्या 'बलून' चित्रपटाला..
इफ्फी महोत्सवात यंदा विशेष ज्युरी पुरस्कार पेमा त्सेदेन यांच्या 'बलून' चित्रपटाने पटकावला. या तिबेटी चित्रपटातील भाषिक सौंदर्याचे आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. रौप्य मयूर, प्रशस्तीपत्र आणि १५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
'अबू लैला' आणि 'मॉनस्टर्स' या चित्रपटांसाठी अमीन सिदी बौमेदिने आणि मॉरिस अल्टेनू यांना पदार्पणातील सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार विभागून देण्यात आला. एका दहशतवाद्याच्या शोधात वाळवंट ओलांडणाऱ्या दोघा बालमित्रांची गोष्ट 'अबू लैला' चित्रपटात आहे. तर, २४ तासांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमधील एका जोडप्याच्या नात्यामधले नाट्य 'मॉनस्टर्स' या चित्रपटात आहे. रौप्य मयूर, प्रशस्तीपत्र आणि १० लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
'हेल्लारो' चित्रपटाला विशेष पुरस्कार...
अभिषेक शहा दिग्दर्शित 'हेल्लारो' या चित्रपटाला परीक्षकांकडून विशेष पुरस्कार देण्यात आला. चित्रपटातील संगीत आणि कोरिओग्राफीचे कौतुक परीक्षकांनी केले. चित्रपटातील महिला सबलीकरणाचा विषय आजच्या काळाशीही सुसंगत असल्याचे परीक्षकांनी सांगितले.आयसीएफटी-युनेस्कोगांधी पदक विशेष पुरस्कार संजय पी. सिंग चौहान दिग्दर्शित 'बहत्तर हूरे' या चित्रपटाला देण्यात आला. या समारोप समारंभाचे सूत्रसंचालन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता कुणाल कपूर यांनी केले. या वेळी विविध शास्त्रीय नृत्य प्रकार आणि हरिहरन यांचे गायन पार पडले.
'रवांडा' चित्रपटाला आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक
रिकार्डो सालवेट्टी दिग्दर्शित 'रवांडा' या चित्रपटाने आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक पटकावले आहे. पॅरिसमधील इंटरनॅशनल काैन्सिल फॉर फिल्म टेलिव्हिजन अँड ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि युनेस्को यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात आला आहे.
उषा जाधवला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार
'माई घाट: क्राइम नं. 103/2005' या मराठी चित्रपटातील प्रभा माईन या व्यक्तीरेखेसाठी उषा जाधव यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भ्रष्टाचारी व्यवस्थेविरोधात आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी एका आईने पुकारलेला लढा या चित्रपटात आहे. रौप्य मयूर पुरस्कार, प्रमाणपत्र आणि प्रत्येकी १० लाख रुपये असे सर्वोत्तम अभिनेता आणि सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्काराचे स्वरूप आहे.
सेऊ जॉर्ज यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा
ब्राझीलचा चित्रपट 'मारीघेला' या चित्रपटातील कार्लोस मारीघेलाच्या भूमिकेसाठी सेऊ जॉर्ज यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा मिळाला. हुकूमशाहीतील शक्तिशाली आणि प्रभावी व्यक्तीरेखा जॉर्ज यांनी साकारली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.