आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Illegal Campaign Spending Also Slows Down; Money Laundering, Liquor Flood Also Reduced

प्रचारातील अवैध खर्चालाही मंदीची झळ; पैसेवाटप, दारूचा महापूर ओसरला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत निवडणूक प्रचारात पैसे, दारू, कपडे, गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करून मतदारांना प्रभावित केले जाते. सहाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात तब्बल १६९ कोटींची रुपयांची जप्तीची कारवाई झाली होती. त्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत जप्तीचा आकडा १०७ कोटींपर्यंतच पोहोचला आहे. विधानसभा निवडणुकीतील या अवैध गोष्टींनाही मंदीची झळ बसल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारास २८ लाख तर लोकसभेच्या उमेदवारास ७० लाख रुपये निवडणूक खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. अर्थात उमेदवार कागदोपत्री मर्यादेच्या आत खर्च दाखवत असले तरी प्रत्यक्षात ताे जास्तच असताे. मतदारांना प्रलोभने देत पैसे वाटप, मद्य व विविध वस्तूंच्या वाटपाच्या बेकायदेशीर मार्गांचाही अवलंब केला जातो. २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ११ ते २९ एप्रिल दरम्यान दरम्यान १६९ कोटी १८ लाख रुपये किमतीच्या वस्तू जप्ती करण्यात आल्या होत्या. त्यात ५३ कोटी २१ लाखांची रोकड आणि ३४ कोटी ११ लाखांच्या मद्याचा समावेश होता. त्यानंतर ६ महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागल्या. २१ सप्टेंबरला आचारसंहिता लागू झाली. तेव्हापासून आजपावेतो राज्यात १०७ कोटी ८७ लाखांचा ऐवज जप्त झाला आहे. त्यात ४४ कोटी २१ लाखाची रोकड असून २० कोटी ५१ लाख किमतीच्या मद्याचा समावेश आहे.

यामुळे जप्तीचा आकडा घटला
लोकसभा निवडणुका एप्रिलमध्ये झाल्या. त्यानंतर पाच महिन्यांनी विधानसभेची आचारसंहिता लागली. दोन्ही निवडणुकांत केवळ सहा महिन्यांचा कालावधी आहे. मात्र सरकारी जप्तीच्या कारवाईचा आकडा घटल्याचे दिसते. या बाबत राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एका अधिकाऱ्याने सांगितले की, लोकसभेची आचारसंहिता दीड महिन्यांची होती. त्या तुलनेत विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा कालावधी महिनाभरापेक्षा मी आहे. त्यामुळे जप्तीच्या ऐवजाचे मूल्य घटल्याचे दिसते.

लोकसभा निवडणुकीत जप्तीची कारवाई
9 लाख रुपयांच्या साड्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कुकर आदी
53 कोटींची रोख रक्कम
34 कोटींचे देशी-विदेशी मद्य
10 कोटींचे अंमली पदार्थ
71 कोटींचा सोने-चांदी ऐवज
169 कोटी रुपये जप्त केलेल्या वस्तूंचे एकूण मूल्य

विधानसभा निवडणुकीत जप्तीची कारवाई
1 लाख रुपयांच्या साड्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कुकर आदी
44 कोटींची रोख रक्कम
20 कोटींचे देशी-विदेशी मद्य
20 कोटींचे अंमली पदार्थ
23 कोटींचा सोने-चांदी ऐवज
107 कोटी रुपये जप्त केलेल्या वस्तूंचे एकूण मूल्य

प्रचारादरम्यान दारूचे वाटप घटले...
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ३४ कोटी ११ लाखांची दारू जप्त झाली होती. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश नंतर दारू वाटपात महाराष्ट्राचा क्रमांक होता. त्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत २० कोटी ५१ लाख रुपयांची दारू जप्त झाली आहे.