आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनापरवाना 16 लाखांची विदेशी दारू घेऊन जाणारा टेम्पो पकडला 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला. शेंडी बायपास चौकात ही कारवाई करण्यात आली. साडेसोळा लाखांची विदेशी दारू घेऊन हा टेम्पो औरंगाबादच्या दिशेने निघाला होता. पोलिसांनी वेळीच हा टेम्पो दारूसह ताब्यात घेतला. 


टेम्पोचालक भगवान बन्सी बडे (४०, राहणार भिलवडे, तालुका पाथर्डी) याला अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना माहिती मिळाली की, एक पांढऱ्या टेम्पोतून (एमएच २०, बीएस ११५८) विनापरवाना विदेशी दारु विक्रीसाठी एमआयडीसी शेंडी बायपास रस्त्याने औरंगाबादच्या दिशेने जाणार आहे. नगर-मनमाड रोड शेंडी बायपास चौकाजवळ जाऊन सापळा लावल्यास हा टेम्पो मिळून येईल, अशी खात्रीशीर माहिती पवार यांना मिळाली. त्यानुसार पवार यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक सचिन खामगळ, सोन्याबापू नानेकर, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, मन्सूर सय्यद, रवींद्र कर्डिले, राम माळी, संतोष लोढे, विजय ठोंबरे, सचिन अडबल, रवि सोनटक्के, विजय वेठेकर यांनी शेंडी बायपास चौकात सापळा लावला. 


त्यानंतर काही वेळातच टाटा कंपनीचा ४०७ मॉडेलचा टेम्पो मनमाड-नगर रोडने आला. त्यावरील चालकाने शेंडी बायपास चौकातून औरंगाबादकडे जाण्यासाठी टेम्पो वळवला. त्याचवेळी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खासगी गाडी टेम्पोसमोर आडवी लावत चालकास ताब्यात घेतले. टेम्पोची पाहणी केली असता त्यात विदेशी दारुचे बॉक्स भरलेले आढळून आले. चालकाकडे दारु वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपूस केली असता त्याने वाहतुकीचा परवाना नसल्याचे सांगितले. टेम्पोत १६ लाख ४१ हजार ६०० रुपये किमतीची दारु, त्यात व्हाईट मिस्चीफ वोडका, ब्लॅक डिलक्स व्हिस्की, डॉक्टर स्पेशल व्हिस्कीचे एकूण २५६ बॉक्स, तीन लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण १९ लाख ४९ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...