आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जायकवाडी धरणाच्या मुख्य 27 गेटच्या डेंजर झोन'मध्ये अवैध वाळू उत्खनन, केवळ पाटबंधारे विभागाच्या पत्रावर परवानगी कशी?

9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पैठण : जायकवाडी धरणाच्या सुरक्षिततेवर या पूर्वीच प्रश्न निर्माण झाला असतानाच आता चक्क धरणाच्या मुख्य २७ गेट समोरून अवैध वाळू उत्खनन होत असल्याने २७ गेटला धोका निर्माण होण्याची शक्यता अाहे. तहसीलदार व पाटबंधारे विभागाने अवैध वाळू उत्खनन करण्यास कोणत्या आधारे परवानगी देत स्वत:च धरणाच्या सुरक्षिततेवर गदा आणली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

१८ आॅक्टोबर १९६५ ला जायकवाडी या मातीच्या धरणाचे भूमिपूजन लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते झाले. तेव्हापासून धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धरणाच्या २७ गेट ते पाटेगाव पुलापर्यंत वाळू उत्खनन प्रतिबंधक क्षेत्र म्हणून शासनाने घोषित केले असताना तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष व पाटबंधारे विभागाच्या ठेकेदार धार्जिनेपणाने धरणाच्या २७ गेट समोरील गेट क्रमांक.१९, २० च्या अगदी समोर पन्नास फुटांच्या अंतरावर डेंजर झोन' मध्ये गेल्या तीन दिवसांपासून अवैध वाळू उत्खनन करण्यात येत आहे. सदरील वाळू ही धरणाच्या गेट क्रमांक १ जवळ पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठीच्या कामात वापरली जात असुून काम करणाऱ्या संबंधित ठेकदाराने वाळू उत्खनन करण्यासाठी तहसील प्रशासनाकडून केवळ पाटबंधारे विभागाच्या पत्रावर परवानगी घेत बेकायदेशीर अवैध वाळू उत्खनन करण्याचा सपाटा ठेकेदाराने लावला आहे. विशेष म्हणजे धरणाचा हा भाग अतिसंवेदनशील समजला जातो. मात्र, या गंभीर व संवेदनशील प्रकाराकडे पाटबंधारे विभागाने कशी परवानगी दिली व तहसीलदार यांनी या गंभीर बाबीकडे का दुर्लक्ष केले याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच, धरणाच्या परिसरात अवैध वाळू उत्खननामुळे धरणाच्या भिंतीला धोका निर्माण होण्याचीही शक्यता आहे.

पाइपलाइन दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून अवैध उत्खनन सुरू असून धरणाच्या भिंतीला खेटून वाळू उपसा होत आहे.

धरणाच्या गेटसमोरून वाळू उपसा थांबवा : अभियंता राठोड

सबंधित ठेकेदार यांना काम थांबवण्याचे सांगितले असून धरणाच्या गेटसमोरून वाळू उपसा न करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यावर कारवाई करु.-सुभाष राठोड, अभियंता.

कोणतीही राॅयल्टी न भरता उपसा सुरू

धरणाच्या मुख्य गेट समोरून वाळूचा उपसा होत असताना कोणत्याही वाळू उपसा करण्याची राॅयल्टी नसताना तहसील प्रशासनाने ही अवैध वाळू उपसा का करू दिला. या विषयी तहसीलदार दत्ता भारस्कर यांना विचारले असताना पाटबंधारे विभागाचे काम सुरू आहे, त्यांनी तसे पत्र दिले असल्याचे सांगितले. मात्र, कोणतीही राॅयल्टी नसताना अशी परवानगी तहसीलदार यांनी कोणत्या आधारे दिली याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

पहिल्यांदाच झाला उपसा

धरणाच्या मुख्य गेट समोरून यापूर्वी कधीच वाळूचा उपसा झाला नाही. धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पुलाजवळून हा वाळू उपसा होत होता. मात्र, आता थेट धरणाच्या मुख्य गेटसमोरून तो करण्यात आला असून वाळू उपसा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.