Crime / जिममध्ये जाणाऱ्या मुलांना अवैधरीत्या स्टेरॉइड इंजेक्शनची होतेयं सर्रास विक्री 

इंजेक्शनमुळे गंभीर धोके 

दिव्य मराठी

Aug 11,2019 11:28:00 AM IST

अकोला : सिव्हिल लाईन्स रोडवरील सनी हेल्थ एंटरप्राइजेस या दुकानातून जिममध्ये जाणाऱ्या मुलांना आरोग्यासाठी प्रचंड घातक असलेल्या स्टेरॉइड इंजेक्शनची अवैधरित्या विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सनी हेल्थ एंटरप्राइजेस आणि खोलेश्वर येथील निवासस्थानी दोन्ही ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून स्टेरॉइडचे आरोग्यास घातक असलेले इंजेक्शन जप्त केले व तिघांना ताब्यात घेतले.

स्टेरॉइडच्या इंजेक्शनची अवैधरीत्या खुलेआम विक्री करणाऱ्या सिव्हिल लाईन्स रोडवरील सनी हेल्थ सेंटर आणि या हेल्थ सेंटरच्या संचालकाच्या खोलेश्वर येथील निवासस्थानी जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलींदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने शनिवारी रात्री छापेमारी केली. या दोन्ही ठिकाणावरुन लाखो रुपयांचा आरोग्यास घातक स्टेरॉइड इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला असून, सचिन ओमप्रकाश शर्मा, विनायक मनोज सुळे, स्वप्नील कैलास गाडेकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. खोलेश्वर येथील रहिवासी सचिन ओमप्रकाश शर्मा,याच्या मालकीचे सिव्हिल लाईन्स रोडवरील सनी हेल्थ एंटरप्रायजेस आणि खोलेश्वर येथील निवासस्थानावरून जीममध्ये जाणाऱ्या युवक व महिलांना बॉडी बनविण्यासाठी स्टेरॉइडचे इंजेक्शन विनापरवानगी तसेच अवैधरीत्याआणि खुलेआम विक्री करीत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख मिलींदकुमार बहाकर यांना मिळाली. त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेउन शनिवारी रात्री सनी हेल्थ सेंटर व त्याच्या निवासस्थानी एकाचवेळी छापेमारी केली. या छापेमारीत एका ठिकाणावरुन ३६ हजार रुपयांचा स्टेरॉइड इंजेक्शनचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. तर दुसऱ्या ठिकाणावरुन ५५ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणावरुन सचिन ओमप्रकाश शर्मा, विनायक मनोज सुळे रा. हरीहर पेठ व स्वप्नील कैलास गाडेकर (रा. तुकाराम चौक )या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती. यासोबतच आरोग्यास घातक असलेली काही औषधी व प्रोटीन जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख मिलींदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.
सनी हेल्थ एंटरप्रायजेससह खाेलेश्वरातील दोन ठिकाणांवर छापे; जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

स्टेरॉइड इंजेक्शन-कॅप्सूल साठा जप्त; तिघांना घेतले ताब्यात
शहरामध्ये जीमचा सुळसुळाट आहे. प्रत्येक जिममध्ये बॉडी बनवण्याचे दावे केले जातात. अनेक युवकांना स्टेरॉईड इंजेक्शन आणि कॅप्सूल घेण्यासाठी गळ घातली जाते. त्याचे परिणाम तत्काळ दिसून येत असल्याने युवकांचा ही त्यावर विश्वास बसतो व युवक त्याला बळी पडतात; मात्र त्याचे दुष्परिणाम त्यांना माहीत नसल्याने ते आपल्या शरीराशी एक प्रकारे नकळतपणे खेळत असतात. पोलिसांनी आता प्रत्येक जिमची झाडाझडती घेऊन त्यांना विक्रीचे अधिकार आहेत का? याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

इंजेक्शनमुळे गंभीर धोके
विशेष पोलिस पथकाने ताब्यात घेतलेले तीन आरोपी.
स्टेराइडच्या इंजेक्शनमुळे महिलांच्या चेहऱ्यावर केस येणे, तर युवकांचे हाड ठिसुळ होणे, किडणीवर परिणाम होणे तर त्यांची जननेंद्रीय कमजोर होण्यासारखे घातक परिणाम होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हार्मोन्स, प्रजननावर प्रतिकूल परिणाम!
स्टेरॉइडचे इंजेक्शन आणि कॅप्सुलच्या स्वरूपात घेतले जातात आणि काहीवेळा तज्ञांच्या सल्ल्यानुसार औषध म्हणून देखील वापरले जाऊ शकते. परंतु बॉडी बनवण्यासाठी युवकांना स्टेरॉइडकडे आकर्षित केल्या जात आहे. अ‍ॅनाबॉलिक स्टेरॉइडचा जितका लवकर परिणाम दिसून येईल, तितक्या लवकर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्याचा वारंवार वापर केल्याने पुरुष हार्मोन्स आणि प्रजनन यावर प्रतिकूल परिणाम होतो. परिणामी पुरुष नपुंसकदेखील होऊ शकतो.

X