बेकायदा प्रवासी : / बेकायदा प्रवासी : 600 भारतीय विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्याचे प्रकरण 

वृत्तसंस्था

Feb 01,2019 09:16:00 AM IST

वॉशिंग्टन- अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करत असल्याच्या आरोपावरून ६०० भारतीयांचा भंडाफोड करण्यात आला आहे. बनावट विद्यार्थी व्हिसाआडून हे लोक अमेरिकेत काम करत होते, असा दावा अमेरिकेतील तपास संस्थांनी केला. विशेष म्हणजे बनावट विद्यार्थ्यांना पकडण्यासाठी तपास संस्थांनी बनावट विद्यापीठ स्थापन केले होते. या सापळ्यात ते रंगेहाथ पकडले गेले.

अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या लोकांना पुराव्यासह अटक करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी बनावट विद्यापीठ सुरू केले होते. या विद्यापीठात अनेक भारतीयांनी नावनोंदणी केली होती. फार्मिंग्टन विद्यापीठ नावाने ही संस्था मिशिगनमध्ये आहे. २०१५ पासून ही संस्था तपास संस्थेच्या अंडरकव्हर ऑपरेशनचा एक भाग आहे, असे अमेरिकन तेलुगू असोसिएशनने (एटीए) म्हटले आहे. हे बनावट विद्यापीठ अवैध नागरिकांना पकडण्यासाठी तयार केले होते. कारवाई झालेल्या विद्यार्थ्यांनी एटीएकडे मदत मागितली आहे. कायदेशीर सल्लागार टीमने भारतीय राजदूत हर्षवर्धन सिंगला यांची यासंदर्भात भेट घेतली असून वाचवण्याची मोहीम सुरू केली आहे, असे एटीएच्या वतीने सांगण्यात आले.

विविध धोरणांची घोषणा : आता उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांना १६ टक्के अधिकार
सरकारने एच-१ बी व्हिसासंबंधीचे नवे धोरण जाहीर केले आहे. १ एप्रिलपासून ते लागू होणार आहे. त्यामुळे पदव्युत्तर पदवी (मास्टर डिग्री) पर्यंत शिकलेल्यांना परदेशी कर्मचाऱ्यांचा एच-१ बीवरील हक्क १६ टक्के असेल. पूर्वी उच्चशिक्षितांसाठी स्वतंत्र श्रेणी नव्हती. अमेरिकेत दरवर्षी ८५ हजार एच-१ बी व्हिसा जारी होतात. त्यात विशेष लॉटरी पद्धतीने २० हजार व्हिसा अमेरिकेतील शैक्षणिक संस्थांतील परदेशी नागरिकांना मिळतो. जनरल लॉटरीद्वारे ६५ हजार व्हिसा इतर श्रेणीत दिला जातो.

४.३० लाख भारतीय अवैध मुक्कामी, चीनपेक्षा दुप्पट
अमेरिकेच्या गृह विभागाच्या म्हणण्यानुसार ४.३० लाख भारतीय अवैध वास्तव्याला आहेत. अमेरिकेत अवैध राहणाऱ्या एकूण नागरिकांपैकी हे ४ टक्के प्रमाण आहे. चीन या प्रकरणात आशियात दुसऱ्या स्थानी आहे. अमेरिकेत २.७० लाख चिनी बेकायदा प्रवासी आहेत. अमेरिकेत सर्वाधिक ६६.४० लाख बेकायदा प्रवासी मेक्सिकोचे आहेत. हे प्रमाण एकूण अवैध वास्तव्याला असलेल्या नागरिकांत ५५ टक्के आहे. अमेरिकेत सुमारे ४५ लाख भारतीय वास्तव्यास आहे.

अमेरिकेत १८५ प्रकारचे व्हिसा
अमेरिकेत वास्तव्य करण्यासाठी परदेशी नागरिकांना व्हिसा अनिवार्य आहे. अन्यथा स्थलांतरित कायद्याचे उल्लंघन ठरते. मात्र, त्याला कॅनडा, बर्मुडा यासह ३६ देशांतील नागरिक अपवाद ठरतात. त्यांना व्हिसा अनिवार्य नाही. मेक्सिकोच्या नागरिकांसाठी वेगळे नियम आहेत. अमेरिकेत सुमारे १८५ प्रकारचे व्हिसा आहेत. गैर-स्थलांतरित व्हिसा व अप्रवासी व्हिसा अशी त्याची विभागणी होते. भारतीयांना अमेरिकेत वास्तव्यासाठी व्हिसा बंधनकारक आहे.

X
COMMENT