आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंदे रोखण्यास अपयशी ठरलेले एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिरुद्ध आढाव व पारोळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास सोनवणे यांची पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी गुरुवारी तडकाफडकी अकार्यकारी पदावर बदली केली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ७२ पोलिस कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या प्रशिक्षणासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावण्यात आले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. 'दिव्य मराठी'ने दिलेल्या वृत्तानंतर ही कारवाई केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
पोलिस अधीक्षक शिंदे यांनी पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना मटका, जुगार, अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पोलिस ठाण्यांमधील कर्मचाऱ्यांनीच हप्तेखोरीसाठी अवैध धंद्यांना संरक्षण देणे सुरूच ठेवले होते. यासंदर्भात "दिव्य मराठीने' गुरुवारी "पोलिस अधीक्षकांच्या इशाऱ्यानंतरही बंदिस्त सट्टा आला खुलेआम मैदानात' या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पोलिस अधीक्षक शिंदे यांनी गुरुवारी ही धडक कारवाई केली.
अशी झाली नेमणूक : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतही पारोळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास सोनवणे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तपासाबाबत तहसीलदारांना सहकार्य करण्यास नकार दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सोनवणे यांची बदली अकार्यकारी पदावर करण्याबाबत पोलिस अधीक्षकांना पत्रही दिले होते. त्यामुळेच पारोळा पाेलिस ठाण्याचे निरीक्षक सोनवणे यांची तर पोलिस ठाणे अद्दीतील अवैध धंदे रोखण्यास अपयशी ठरलेले एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिरुद्ध आढाव यांचीही अकार्यकारी पदावर बदली केली.
पोलिस ठाण्यांचे 'कलेक्टर' असलेल्यांचे समुपदेशन जिल्ह्यातील पोलिस दलातील कर्मचाऱ्यांसाठी २३ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत एका महिन्याचे विशेष नवचैतन्य प्रशिक्षणाचे आयोजन मुख्यालयात करण्यात आले आहे.
या सत्रासाठी बायोमेट्रिक पद्धतीने सकाळ, दुपार, रात्री अशी तीन वेळा हजेरी होणार आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांच्या इशाऱ्यानंतरही पोलिस ठाण्यांचे "कलेक्टर' अशी ओळख असलेल्या ७२ पोलिस कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणाच्या नावाखाली एक महिनाभर पोलिस अधीक्षक कार्यालयात त्यांना जमा करण्यात आले आहे. आता पोलिस अधीक्षक त्यांचे समुपदेशन करणार आहेत. पोलिस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
पत्रकारांचा पाठलाग करणाऱ्यांचाही बंदाेबस्त करा
शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर लक्ष ठेवून त्याचा पर्दाफाश करणाऱ्या पत्रकारांकडून खऱ्या अर्थाने पाेलिसांना मदतच केली जाते; परंतु अवैध धंद्याच्या ठिकाणांचा शाेध घेऊन त्या ठिकाणचे छायाचित्रण करणाऱ्या पत्रकारांचा मात्र अवैध धंदे चालकांकडून पाठलाग केला जाताे. तसेच पत्रकारांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाताे. अशांचा पाेलिसांनी बंदाेबस्त करणे गरजेचे अाहे. वृत्तपत्रात बातमी अाल्यामुळेच अाम्हाला कारवाई करावी लागते, अशी माहिती पाेलिसांकडून अवैध धंदे चालकांना दिली जाते हे विशेष अाहे. यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालण्याची गरज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.