Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Imitiaz Jalil conquers; Harsh Vardhan Jadhav defeats Khairn

इम्तियाज जलील विजयी; हर्षवर्धन जाधव यांनी केला खैरेंचा पराभव, खैरेंच्या पराभवाची ही देखील कारणे

प्रतिनिधी | Update - May 24, 2019, 09:51 AM IST

सहा महिन्यांपूर्वी खैरे व हर्षवर्धन जाधव यांच्यात वाद झाल्यानंतर जाधव यांनी वेगळी चूल मांडली

 • Imitiaz Jalil conquers; Harsh Vardhan Jadhav defeats Khairn

  औरंगाबाद - अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे इम्तियाज जलील साडेचार हजार मतांनी विजयी झाले. ते या पक्षाचे महाराष्ट्रातील पहिले खासदार ठरले आहेत. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना २ लाख ८१ हजार मते मिळाली. त्यामुळे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. खैरे यांचा त्यांच्या आयुष्यातील हा पहिला पराभव ठरला आणि कारणीभूत ठरले ते हर्षवर्धन जाधव. इम्तियाज यांना ३ लाख ८९ हजार मते मिळाली तर खैरे हे ३ लाख ८४ हजारांवर थांबले. दोघांतील मतांचे अंतर हे साडेचार हजार. तर ४९१९ मते नोटाला मिळाली. नोटाला मिळालेली मते ही खैरेंवर नाराज असलेल्या मतदारांची असल्याची चर्चा आहे. म्हणजेच जर नोटाला मतदान झाले नसते तर कदाचित खैरे विजयी होऊ शकले असते.


  सहा महिन्यांपूर्वी खैरे व हर्षवर्धन जाधव यांच्यात वाद झाल्यानंतर जाधव यांनी वेगळी चूल मांडली. स्वत:च्या शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन केला आणि लोकसभा लढणार असे जाहीर केले. त्यानुसार ते लढले. त्यांना मिळालेली मते ही लक्षणीय आहेत. एखाद्या अपक्ष उमेदवाराला इतकी मते मिळाल्याचे उदाहरण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात यापूर्वी कधीही नाही. जाधव यांनी मते घेतल्याने खैरे हे ४ लाखांच्या पुढे जाऊ शकले नाही. गत वेळी खैरे हे साडेपाच लाखांपर्यंत गेले होते. तर पराभूत उमेदवार नितीन पाटील यांना ३ लाख ५८ हजार मते मिळाली होती. त्यापेक्षा ४० हजार जास्त मते घेऊन इम्तियाज आता खासदार झाले आहेत. सरळ लढत झाली असती तर चित्र वेगळे दिसले असते.


  जाधवांना ग्रामीणला जास्त मते
  जाधव यांना ग्रामीण भागातून मोठी साथ मिळाली तसेच शहरातूनही मतदान झाले. याचा फटका खैरे यांना बसला. दुसरीकडे काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांना ९१ हजार मते मिळाली. गतवेळीच्या तुलनेत ती अडीच लाखांनी कमी आहेत. ही मते इम्तियाज यांच्याकडे गेल्याचे बोलले जाते.

  फटाके वाजवून आनंदोत्सव
  बुढीलेन येथील दारुस्सलाम या एमआयएमच्या कार्यालयावर हजारो कार्यकर्ते एकत्र जमले. संध्याकाळी सात वाजेपासूनच जय मीम आणि जय भीमच्या घोषणांनी बुढीलेन परिसर दणाणून गेला. कौन आया, कौन आया, शेर आया शेर आया अशा घोषणा देत तरुणांनी फटाके फोडले. रात्री अकराच्या सुमारास इम्तियाज हे कार्यालयात आले ताेपर्यंत हा जल्लोष कायम होता.

  नऊ वाजताच शहर बंद
  इम्तियाज हे निवडून आल्याची घोषणा होताच शहरात तरुणांच्या दुचाकी रॅली सुरू झाल्या. अनुचित प्रकार घडू नये म्हणून जुन्या शहरातील सिटी चौक, गुलमंडी, पैठण गेट, मच्छली खडकसह निराला बाजार आणि औरंगपुऱ्यातील दुकाने बंद झाली. या वेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.


  चंद्रकांत खैरे

  384550
  पराभूत मते

  इिम्तयाज जलील
  389042
  विजयी मते

  4492
  मतांची आघाडी

  > ‘नोटा’ला ४९१९ मते, नाराजीही भोवली
  > १९९९ नंतर प्रथमच बसपाची मते घटली
  > अपक्ष जाधव यांना २,८३,७९८ मते

  काय भोवले चंद्रकांत खैरेंना

  > नाराजी: खासदाराकीच्या चार टर्मनंतर अँटी इन्कबन्सी. विकास कामांबद्दल प्रश्नचिन्ह


  > हे पण झाले: वर्षभरापासूनच खैरे यांना उमेदवारी नको असा पक्षांतर्गत एका गटात मतप्रवाह होता.

  > मित्रपक्ष: विकासकामांबद्दल शहरातील नाराजी पाहता भाजपतील काही पदाधिकारी दोन हात दूर राहिले. युतीधर्म म्हणून दिखाव्यापुरते प्रचारात होते. काहींनीं जाधवांचे काम केले.


  > पाणी,कचरा समस्या: कचरा प्रश्न देशभरात गाजला. गोळी चालली. तरीही अद्याप सुटला नाही. समांतरचे भिजत घोंगडे कायम आहे. दुसरीकडे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अपयश.

  हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेली २८३७९८ मते

  अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेली ठोस भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. खैरेंना पर्याय म्हणूनही पाहिले गेले.

  सुभाष झांबडांची ९१७८९ मते

  काँग्रेसचे सुभाष झांबड यांची हक्काची मते वंचित बहुजन आघाडीकडे एकवटली.पहिल्यांदाच काँग्रेस लाख मतांचा आकडाही गाठू शकली नाही.

  ४० वर्षांनंतर शहराला मिळाला मुस्लिम खासदार
  तब्बल ४० वर्षांनंतर औरंगाबादला मुस्लिम खासदार मिळाला आहे. यापूर्वी काझी सलीम हे खासदार होते. त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर इम्तियाज जलील औरंगाबादचे दुसरे मुस्लिम खासदार बनले.

  काँग्रेसची व्होट बँक गायब
  २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही काँग्रेस उमेदवार नितीन पाटील यांना ३ लाख ५८ हजार मते मिळाली होती. म्हणजे ही काँग्रेसची व्होट बँक आहे, असा दावा करण्यात येत होता. त्यात घसरण झाली तरी काँग्रेस उमेदवार ३ लाख मते घेईल, असा अंदाज होता.

Trending