आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाख रुपयांची तात्काळ मदत देऊन बाधित शेतकर्‍यांचे पिक आणि वीज बील माफ करावे- अजित पवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात अवकाळी व परतीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान केले असून सरकारने हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तात्काळ द्यावी अशी मागणी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी आज राज्यपालांकडे केल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली.
राज्यात शेतीचे आणि इतर जे नुकसान झाले याची माहिती संयुक्त पुरोगामी आघाडीच्या वतीने राज्यपालांना देण्यात आल्याचे अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले. परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचा विचार करता सरकारने 10 हजार कोटी रुपयांची जाहीर केलेली रक्कम अपुरी असून 25 हजार कोटीची रक्कम मिळाली पाहिजे अशी मागणीही केल्याचे अजितदादा पवार म्हणाले.नुकसानीचे अजून पंचनामे सुरू आहेत, 6 तारखेपर्यंत मुदत दिली आहे. ती आम्ही वाढवून मागितली आहे. 
सोयाबीन, तूर, ज्वारी आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत मिळाली पाहिजे अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले.  महाराष्ट्रात दीड कोटी एकरामध्ये पिकांचे नुकसान झाले असल्याचे आम्ही राज्यपालांच्या निदर्शनाला आणले आहे. शिवाय राज्यातला 750 किलोमीटरच्या सागरी किनाऱ्यावर मच्छीमारांचे नुकसान झालं आहे. वादळामुळे त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याबाबतीत ही सरकारने विचार करावा आणि राज्यपालांनी याबाबतच्या सूचना कराव्यात असेही सांगितले असल्याचे अजितदादा पवार म्हणाले.

मागच्या वेळी अतिवृष्टी झाली त्याची मदत अद्याप पीडितांना मिळालेली नाही. त्यामुळे सरकारने सेल्फ draft काढून मदत करावी असेही अजितदादा पवार म्हणाले. शेतकर्‍यांचे पिक कर्ज माफ करावे. वीज बील माफ करावे. शिवाय परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे. या परतीच्या व अवकाळी पावसाने 
कोणतेही पीक शिल्लक राहिलेली नाही. त्यासोबत पशुधन आणि घरांचेही नुकसान झालेले आहे. त्यासाठीची मदत मिळावी अशी मागणीही अजितदादा पवार यांनी केल्याचे सांगितले. द्राक्षांच्या, संत्र्याच्या बागा लोकांनी तोडून टाकल्या आहेत. लोकांना बियाणे आणि खते दिली पाहिजे. आमचा पोशिंदा उभा राहिला नाही तर हे सरकार पडेल असा इशाराही अजितदादा पवार यांनी दिला. बहुमत मिळूनही हे लोक सत्ता स्थापन करत नाही.शेतकरी उध्वस्त झाला आहे त्याचे या लोकांना काहीही पडले नाही असा संतापही अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.खाजगी कंपन्यांनी विम्याची नफेखोरी केली असून सरकारने ती मदत मिळवून दिली पाहिजे अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना केली. पुरातील बाधित लोकांसाठी 6800 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारने केली होती. ती मदत अद्याप मिळालेली नाही. आता दहा हजार कोटींची मदत कधी मिळणार असा सवालही बाळासाहेब थोरात यांनी सरकारला केला. काळजीवाहू सरकार आहे पण सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही. सरकारने भक्कमपणे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे असेही आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

राज्यपाल भेटी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, आमदार अमित देशमुख,आमदार धीरज देशमुख, आमदार शरद रणपिसे, आमदार यशोमती ठाकुर, आमदार हुस्नबानू खलिफे, आमदार अनिकेत तटकरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...