आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाजाला लगेच आरक्षण दिले, मुस्लिमांबाबत टाळाटाळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : 'राज्यघटनेला बाजूला ठेवून काही कायदे करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे. देशाला धर्मांध राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न या लाेकांनी सुरू केला आहे. मात्र खंबीर विराेधकांची भूमिका वठवताना आम्ही हा प्रयत्न कदापि यशस्वी हाेऊ देणार नाही,' असा इशारा एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन अाेवेसी यांनी रविवारी पुण्यातील जाहीर सभेत दिला. वर्षानुवर्षे सत्तेची फळे चाखणाऱ्या मराठा समाजाला महाराष्ट्र सरकारने लगेच आरक्षण दिले. मात्र, मुस्लिमांना आरक्षण देण्यास मात्र सरकार कचरते,' अशी टीकाही त्यांनी केली.

एमआयएम उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यात आयाेजित सभेत ते बाेलत हाेते. 'भाजप-शिवसेना अथवा काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांच्या चुकांवर नेमके बोट ठे‌वण्याची क्षमता फक्त एमआयएमच्या नेत्यांमध्ये आहे. सर्वसामान्याचा दबलेला आवाज घेऊन ते विधानसभेत जातील. काँग्रेस कमजोर पक्ष झाला आहे. कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी त्यांना संजीवनी मिळू शकणार नाही. कारण काँग्रेसची नेतेमंडळीच भाजपपुढे हतबल झाली आहे, अशी टीकाही अाेवेसी यांनी केली. भाजपवर टीका करताना ते म्हणाले, 'हिमाचल प्रदेशमधील सरकारने नवीन कायदा आणला आहे, त्यानुसार एखाद्याला धर्मांतर करायचे असेल तर आधी एक महिन्याची नाेटीस द्यावी लागेल. संबंधितांचे धर्मांतर करणाऱ्या धर्मगुरूंनादेखील नोटीस द्यावी लागणार आहे. कोणी कोणता धर्म स्वीकारावा याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र भारतीय संविधांनाची मोडतोड करून सरकार जाचक कायदे बनवू पाहत आहे. मात्र आम्ही त्यांचे हे प्रयत्न कदापि यशस्वी हाेऊ देणार नाही. आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी परदेशात जाऊन देशात सर्वकाही आलबेल असल्याचे सांगतात आणि देशात एखाद्याला दहशतवादी ठरवताना हेच सरकार भेदभाव करते,' असा आराेपही त्यांनी केला.

मोदींच्या मर्जीवर देश चालत नाही : इम्तियाज जलील
'देशातील नागरिकांनी ठरवले तर ते माेदींना पुन्हा चहा विकायला पाठवतील. देश मोदींच्या मर्जीवर चालत नसून भारतीय संविधानावर चालतो,' असे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी सांगताच 'चाैकीदार चाेर है'च्या घाेषणा उपस्थितांनी दिल्या. 'एमआयएमला मुस्लिमांचा पक्ष म्हणून हिणवले जाते, मात्र अाम्ही समाजातील पददलितांना उमेदवारी दिली आहे. पैशात कुत्री-मांजरं विकत घेता येतात, आमचे शेर विकत घेऊ शकत नाही,' असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

बातम्या आणखी आहेत...