आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदीचा प्रभाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिढ्यान्पिढ्या केवळ मराठी (मराठवाडी) चा वापर करणारं आमचं पाटील घराणं. आमच्याकडे येणारा कोणताही भाषिक आमच्याशी मराठीतूनच बोलत असे. खरी मराठी ग्रामीण जनतेनेच टिकवून ठेवली, याचाही आम्हाला अभिमान आहेच. लेक, जावई, मुलं, नातवंडांसह एप्रिल 2011 मध्ये दक्षिण भारताच्या सहलीवर गेलो होतो. दक्षिणेत मातृभाषा आणि इंग्रजीचा वापर सर्वश्रुत आहे. आता थोडी हिंदी भाषा तिकडे व्यवहारात येऊ लागली आहे. हिंदीला इंग्रजीचे ठिगळ जोडून एक महिन्याचा प्रवास पार पडला. त्यामुळे एकप्रकारे हिंदीचा झराच आमच्याकडे पाझरू लागला होता.

मे 2012 मध्ये आम्ही आमच्या क्रुझर गाडीने उत्तरेत 5600 किलोमीटरचा प्रवास करून आलो होतो. अत्यंत प्रतिकूल हवामानात प्रवास, एकमेव हिंदीच्या वापरामुळे मानसिक ताण कमी करणारा होतो. निसर्गसौंदर्याने डोळे तृप्त होतात, तर त्याच्या रौद्ररूपाने हृदयाचे ठोके वाढतात. अशा या प्रवासात स्थानिक लोकांशी हिंदीत संवाद साधावा लागतो. तेहतीस दिवसांच्या प्रवासात आमची नातवंडं थोडं-थोडं हिंदी बोलू लागली होती. विशेषत: ऋषिकेश येथील डॉ. निधी यांनी मला दादाजी आणि सौभाग्यवतीला माताजी नावाने संबोधल्यामुळे आमची नातवंडं आजही उभयतांना त्याच नावाने संबोधित करतात.

प्रवासानंतर आम्ही कुटुंबीय मराठीतूनच बोलू लागलो होतो. एप्रिल 2013 मध्ये कर्नाटकातील लक्ष्मी ही आमची थोरली सून म्हणून कुटुंबात आली. ती कानडी पदवीधर असल्याने तिची हिंदी उत्तम आहे. साहजिकच आम्हाला तिच्याशी बोलताना हिंदीचा व मधूनमधून मराठीचा वापर करावा लागतो. लक्ष्मीला मराठी शिकण्याची व महाराष्‍ट्रीयन पद्धत अवगत करण्याची जिद्द आहे. तिचा मनमोकळा स्वभाव पाहता लवकरच त्यात यशस्वी होईल. आमचे कुटुंब, आप्त-मित्रमंडळींमध्ये सध्या मायमराठीच्या बरोबरीने मावशी हिंदीही रूढ झाली आहे.