Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Impact of Rafale scam on Nashik campaign

देशपातळीवर गाजणाऱ्या 'राफेल घाेटाळ्या'चा नाशिकच्या प्रचारातही प्रभाव

जयप्रकाश पवार | Update - Apr 12, 2019, 09:00 AM IST

काेकाटे, पवन पवारांची उमेदवारी निवडणुकीचे भवितव्य ठरवणार 

 • Impact of Rafale scam on Nashik campaign


  नाशिक - नाशिकची निवडणूक आजी-माजी खासदारांत चुरशीची होताना दिसत असली तरी त्याहून महत्त्वाचे म्हणजे जागतिक पातळीवर चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या राफेल अन्् बोफोर्स या दोन मुद्द्यांचा थेट संबंध नाशिकशी असल्याने त्या अंगानेही ती बहुचर्चित झाली आहे. ईडीच्या दीर्घ वनवासातून बाहेर आलेल्या छगन भुजबळ - समीर या काका- पुतण्यांसाठी ही निवडणूक राजकीय ऊर्जितावस्थेत येण्यासाठी 'करो या मरो'ची लढाई ठरणार आहे. तर शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना स्वपक्षीयांच्या नाराजीची बांधबंदिस्ती करून पुन्हा एकदा 'जायंट किलर' बनण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पण, माजी आमदार माणिकराव कोकाटे अन् वंचित आघाडीचे पवन पवार यांच्या जोरदार शक्तिप्रदर्शनाने एकूणच निवडणुकीचा नूरच पालटून टाकला आहे.


  निवडणूक कार्यक्रम जाहीर हाेण्यापूर्वीच नाशिकमधील वातावरण निवडणूकमय झाले होते. त्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे, 'नाशिकला काय हवंय?' या शीर्षकाखाली शहरभर लागलेल्या बॅनर्समुळे. या कॅम्पेनचे सूत्रधार माजी खासदार समीर भुजबळ असल्याचे उघड झाल्यावर पाठोपाठ त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारीही जाहीर केल्यावर खऱ्याअर्थाने निवडणुकीचा फड गाजू लागला. शिवसेनेतून गोडसे यांच्या उमेदवारीला विराेध हाेत हाेता. त्यांच्याएेवजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना रिंगणात उतरवावे, असा आग्रह काही शिवसैनिकांचा होता. पण पक्षाला उशिराने का हाेईना पुन्हा गाेडसे यांचेच नाव जाहीर केले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये समीर यांच्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत चलबिचल झाली हाेती, परिणामी ही निवडणूक कोणत्या दिशेने चालली आहे हेच त्यावरून स्पष्ट होते.


  निवडणुकीची घोषणा हाेण्यापूर्वीच सिन्नरचे माणिकराव कोकाटे यांची खासदारकीची महत्त्वाकांक्षा प्रबळ झाली हाेती. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांनी केलाही, पण त्यांनी काेणालाही जुमानले नाही. इतकेच नव्हे, तर जाेरदार शक्तिप्रदर्शन करत अर्जही दाखल केला. गोडसे विरुद्ध भुजबळ लढतीत आपण सहीसलामत निघून जाऊ, असा त्यांचा दावा आहे. अशीच स्थिती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांची होऊ शकते, असा अंदाज घेत प्रकाश आंबेडकरांनी एका बाजूला भुजबळांना चर्चेत गुंतवले अन्् पाठोपाठ उमेदवारही रिंगणात उतरवला. आता प्रचाराच्या फडात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार व प्रकाश आंबेडकर यांच्या सभांमुळे रंग चढला आहे. देशपातळीवर राफेल विमानांच्या खरेदीचा घोटाळा चर्चेत आला होता. राहुल गांधी याच मुद्द्याच्या आधारे माेदींना लक्ष्य केले, पण, जेव्हा राफेलच्या निर्मितीचा प्रश्न नाशिक जिल्ह्यातील


  ओझरमिगस्थित एचएएल कारखान्याशी संबंधित असल्याचे बाहेर येऊ लागले तेव्हा विरोधकांच्या प्रचाराचा रोख अधिक प्रभावी होत गेला. त्या विमानांच्या उत्पादनाचे काम एचएएलला मिळाले असते तर पुढील अनेक पिढ्या येथील रोजगाराचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला असता, असा एक मतप्रवाह व्यक्त होऊ लागला. राजीव गांधी यांच्या काळातही बोफोर्सचा घोटाळा गाजला होता. त्या बहुचर्चित तोफेची पहिली चाचणी नाशिकच्या भूमीत झाली होती. त्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक ही उमेदवारांमुळेच नव्हे, तर राफेल अन् बोफोर्सच्या पार्श्वभूमीमुळेही बहुचर्चित ठरू पाहते आहे.

  या मतदारसंघात नाशिक मध्य, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम, नाशिक रोड-देवळाली, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्याचा तोंडवळा बव्हंशी शहरी असला तरी त्याला आदिवासीबहुल तालुक्यांचीही जोड आहे. जळगाव, धुळे व नंदुरबारच्या खान्देशी व अहिराणी पट्ट्यातील स्थलांतरित मंडळींचाही इथे चांगलाच बोलबाला आहे. थोडक्यात काय तर हा मतदारसंघ 'कॉस्मोपॉलिटन' म्हणूनही परिचित आहे. तथापि, मध्यंतरीच्या काळात मराठा मोर्चा, प्रत्युत्तरादाखल निघालेला ओबीसी- मुस्लिमांचे महामाेर्चे या आंदाेलनामुळे संबंध समाज ढवळून निघाला. त्याच काळात नाशिकच्या पंचक्रोशीत जातीय दंगलींचेही गालबोट लागले. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये मोर्चाची प्रतिक्रिया प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या उमटल्याचे दिसून आले. त्या कडवट आठवणींचा विसर कितपत पडला असेल हे कुणीच सांगू शकत नाही.

  काेकाटे, पवन पवारांची उमेदवारी निवडणुकीचे भवितव्य ठरवणार
  शांतीगिरी महाराज यांनी 'राजधर्म' पाळण्याची घोषणा केली खरी, पण नंतर त्यांनी माघार घेतली. छावा संघटनेचे करण गायकर यांची उमेदवारीदेखील वेगळा रंग भरू पाहते आहे. ही निवडणूक 'भावनिक' पातळी किती गाठते यापेक्षाही शेतकऱ्यांचे प्रश्न, मतदारसंघातील स्मरणात राहू शकतील अशी विकासकामे, दुष्काळ, पाण्याचा प्रश्न, रोजगार व औद्योगिक विकास हे प्रश्नदेखील कळीचे मुद्दे ठरू शकतात. या मतदारसंघात सुरुवातीच्या काळातील दोन अपवाद वगळले तर एक उमेदवार सलग दुसऱ्यांदा निवडून येत नाही, अशी 'आख्यायिका' आहे. बंडखाेर माणिकराव काेकाटे, वंचित आघाडीचे पवन पवार हे दाेघेही किती मते घेतात यावर पुढचे भवितव्य अवलंबून असेल. यापैकी एखाद्याने माघार घेतली तर त्याच्या वाट्याची मते शिवसेनेकडे जातात की राष्ट्रवादीकडे यावरही बरेच काही अवलंबून असेल.

Trending