आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल स्क्रीनमुळे २० टक्के विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बदललेल्या जीवनशैलीसोबतच रोजच्या जेवणात झालेला पश्चिमात्य बदल व रोज कमीत कमी दोन ते तीन तास स्क्रीन गॅजेटचा वापर केल्यामुळे ५ ते १५ वयोगटातील मुलांमध्ये चष्मा लावण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. २० वर्षांपूर्वी काही जन्मजात दोष असल्यामुळे एका वर्गामध्ये एक ते दोन मुलांमध्ये चष्मा घालण्याचे प्रमाण दिसून येत होते. ते आजच्या घडीला वाढून ५ ते १० झाले आहे. आज ५० मुलांमध्ये  सरासरी ५ ते ८ मुलांना चष्मा लागतो, अशी माहिती प्रख्यात बाल नेत्रविकारतज्ञ मोनिका सामंत यांनी दिली.
माझा १० वर्षांचा मुलगा रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर खेळतच असतो अथवा माझी दोन वर्षांची चिमुरडी मोबाइलवर गाणी अथवा कार्टून लावले नाही तर जेवतच नाही, अशा काही विचित्र समस्या आज मोठ्या शहरापासून ते थेट छोट्या गावांपर्यंत ऐकू येत आहेत. मोबाइल न दिल्याने  किशोरवयीन मुलाने केलेली आत्महत्या असो वा कॉलेजमधील मुलाने मोबाइलच्या वेडापायी केलेला एखादा गुन्हा असो, आपण करमणूक म्हणून या बातम्या वाचतो, परंतु  मोबाइल स्क्रीनच्या अति वापरामुळे शाळकरी मुलांमध्ये वाढत असलेल्या समस्यांची दाहकता आपल्याला अजून जाणवलेली नाही. टीव्ही, मोबाइल, टॅब्लेट, कॉम्प्युटर, गेम स्क्रीन (एक्स बॉक्स- प्ले स्टेशन) व लॅपटॉपच्या अति वापरामुळे जवळपास १८ ते २० टक्के मुलांमध्ये दृष्टिदोष आढळत असल्याचे निरीक्षण पनवेल येथील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटतर्फे करण्यात आले आहे.

याविषयी डॉ. सामंत यांनी सांगितले, एका जागेवर बसून सलग एक ते दोन तास मोबाइल अथवा इतर गॅजेटवर वेळ घालवल्यामुळे त्यांना मैदानी खेळ खेळण्याची इच्छा होत नाही. स्क्रीनच्या वाढत्या वापरामुळे शाळकरी मुलांचा डोळ्यांचा आकार वाढतो तसेच डोळ्यातील बाह्य आवरण कमी पडते. डोळ्याचे स्नायू थकून जातात तसेच ते डोळे कोरडे हाेतात व ताण वाढल्यामुळे दृष्टिदोष निर्माण होतात. भारतातील वैद्यकीय अनुमानानुसार अडीच वर्षांपर्यंतच्या मुलांना मोबाइल हाताळायला देणे हीच मोठी चूक आहे. कारण छोट्या स्क्रीनवर चलचित्र सातत्याने पाहण्याइतकी त्यांच्या डोळ्यांची वाढ झालेली नसते, असे असूनही भारतातील पालक सर्रासपणे आपल्या मुलांना मोबाइलचा वापर करण्यास देतात. एक ते दोन तास टीव्ही म्हणजेच मोठी स्क्रीन लगेच थोड्या वेळाने मोबाइलवर गेम खेळणे  (छोटी स्क्रीन) नंतर लॅपटॉप अथवा कॉम्प्युटरचा वापर अशा विचित्र सवयींमुळे डोळ्यांवरील ताण वाढतो.
मुलांमध्ये मानसिक व शारीरिक बदल


जागतिक पातळीवर झालेल्या अभ्यासातून समोर आले आहे की, खूप जास्त स्क्रीन टाइममुळेसुद्धा मुलांमध्ये अनेक मानसिक व शारीरिक  बदल घडत असतात. आजकाल नवीन  अॅप्स तसेच व्हिडिअो गेम यांची  रचना अशा प्रकारे होत चालली आहे की,  मुलांमध्ये जास्तीत जास्त त्याविषयी आतुरता निर्माण व्हावी. एकदा का जर ती चटक अथवा व्यसन लागले तर त्याच्यावर उपचार करणे हे दारूड्याकडून दारू सोडवण्यापेक्षाही अवघड असल्याचे मत मनोविकारतज्ञ  डॉ.  प्रतीक सुरंदशे यांनी व्यक्त केले. संपूर्ण भारताचा विचार करता चार ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना चष्मा लागण्याचे प्रमाण १२ ते १५ टक्के असून ते ग्रामीण भागामध्ये सहा टक्के आहे. परंतु अति सुधारित शहरांमध्ये हे प्रमाण २० टक्के असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली.