आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेलिग्रामचे मह्त्त्व पटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

163 वर्षांची तार (टेलिग्राम) सेवा तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तसेच उत्पन्न घटल्याने गेल्या महिन्यात बंद झाली. ही बातमी वाचून मला तीस वर्षांपूर्वी याच टेलिग्रामचे महत्त्व पटले होते. टेलिग्राममुळे माझ्या पतीला त्यांच्या आईचे म्हणजे माझ्या सासूबाईचे अंत्यदर्शन घेणे शक्य झाले. माझ्या पतीची बदली कर्नाटकात विजापूरला झाली होती. मी, माझ्या सासूबाई, आणि माझी दोन मुले औरंगाबादलाच राहत होतो. त्या वेळी आईची प्रकृती चांगली होती. त्यांना ब्लडप्रेशर आणि मधुमेहाचा त्रास होता. एके दिवशी रात्री बाराच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. अस्वस्थता वाढतच चालली होती. काही हालचाल करून डॉक्टरांना घरी आणेपर्यंत सासूबार्इंचे निधन झाले. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्या वेळी आजच्यासारखी घरोघरी टेलिफोनची सुविधा नव्हती. त्यामुळे माझ्या पतींना विजापूरला आईच्या निधनाचे वृत्त टेलिग्रामने कळवावे लागले.

ती त्यांना दुस-या दिवशी सकाळी मिळाली असावी. विजापूर ते औरंगाबाद प्रवास 12 तासांहून अधिक होता. ते खासगी वाहनाने येण्यास निघाले. इकडे सासूबार्इंच्या निधनाची वार्ता आमच्या नातेवाइकांत पसरली होती. घरी लोक जमा होत गेले. रात्री बारा वाजता निधन झालेले असल्याने लोकांनी सकाळी अंत्यसंस्कारासाठी घाई सुरू केली. संध्याकाळचे सात वाजत आले, तरी माझे पती न आल्याने लोकांनी नाइलाजाने नेण्याचे ठरवले. पण इतक्यात एक पोस्टमन हातात तार घेऊन घरी आला. त्यात त्यांनी अंत्यदर्शन थांबवावे, अशी विनंती केली होती. पोस्टमनने तत्परतेने तार आणली होती. मुलाला निरोप दिला. लोकांनी स्मशानभूमीत थोडा वेळ वाट पाहिली आणि माझ्या पतीला आईचे दर्शन घेता आले. हे सर्व त्या वेळी आलेल्या तारेमुळे शक्य झाले. ‘तार’ हा शब्द काही अशुभ वर्तमान असल्याचेच दर्शवत असायचा, पण त्यामुळे काही महत्त्वाचे निरोपही त्वरेने मिळत होते.