आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन अणदुरेच्या घरातून बँक पासबुक, महत्त्वाची कागदपत्रे एटीएसच्या ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ज्येष्ठ समाजसेवक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या सचिन अणदुरे याच्या कुंवारफल्ली भागातील घरातूून दहशतवादविरोधी पथकाने ( एटीएस) सर्व कागदपत्रे, बँकेचे पासबुक आणि काही महत्त्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, सचिनच्या अटकेनंतर शहरातील हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित चार ते पाच कट्टर कार्यकर्ते भूमिगत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


दाभाेलकर यांच्यावर गोळ्या झाडणारा सचिन असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. १४ ऑगस्ट रोजी एटीएसने सचिनला निराला बाजार भागातून नालासोपारा येथे सापडलेल्या शस्त्रास्त्र साठा प्रकरणात ताब्यात घेतले होते. दोन दिवस चौकशीनंतर दाभोलकर यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या सीबीआयने त्याला ताब्यात घेतले. सचिनचे बालपण धावणी मोहल्ल्यात गेले असून लहानपणापासूनच तो धार्मिक वृत्तीचा होता. त्याचे शालेय शिक्षण गुजराती विद्यालयात झाले असून एसबी महाविद्यालयातून त्याने एम.कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अकोल्याला राहत असलेल्या बहिणीव्यतिरिक्त व पैठणला धार्मिक कार्यक्रमालाही तो नेहमी जात होता, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, सीबीआयच्या मंगळवारच्या कारवाईची भनक लागताच शहरातील हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित चार ते पाच संशयित कार्यकर्ते भूमिगत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नालासोपारा प्रकरण समोर आल्यानंतर कळसकर, सचिनसह चार ते पाच तरुणांवरही तपास यंत्रणा नजर ठेवून होत्या. परंतु सचिनला अटक झाल्याचे कळताच यातील चार ते पाच जण फरार झाले. त्यांचा नालासोपाऱ्यात सापडलेल्या शस्त्रसाठ्यासह दाभाेलकर हत्येशी महत्त्वाचा संबंध असल्याचा दाट संशय तपास यंत्रणेला होता. परंतु त्याआधीच ते भूमिगत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 


अटकेपूर्वी एटीएसचे पथक होते पाळत ठेवून, आधी सचिन समजून उचलले होते दुसऱ्यालाच : १४ ऑगस्टपूर्वी तीन ते चार दिवस एटीएसचे एक पथक सचिन काम करत असलेल्या दुकानाबाहेर पाळत ठेवून होते. १४ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास एटीएस पथकाने दुकानासमोर जाऊन एका चहा विक्रेत्याला विचारले. तेव्हा त्याने साबू यांचा नातेवाईक असलेल्या एका मुलाकडे बोट केले. त्यांनी रस्त्यावरच त्याला पकडून गाडी ढकलत गाडी पुढे नेली. परंतु त्या मुलाने विरोध करत आरडाओरड सुरू केली. खडकेश्वर मंदिराजवळ जाताच त्याला तू सचिनच का, असे विचारले असता त्याने त्याच ओळखपत्र दाखवले. तेव्हा आपण चुकीच्या तरुणाला उचलल्याचे समजले. त्यांनी त्याला दुकानाजवळ आणून सोडले. परंतु तो साबू यांचाच नातेवाईक असल्याने त्याने सचिनला लाऊडस्पीकरवर कॉल करायला सांगून कधी येत आहे, असे विचारायला लावले. हा प्रकार साबू यांना कळला. त्यांनी मीच सचिनला यायला सांगतो असे सांगितले. सचिनला कॉल करून त्यांनी तुझ्याकडे क्रांती चौक पोलिस आले आहेत, काय प्रकरण आहे बघून ये, असे सांगितल्यावर सचिन स्वत: क्रांती चौक पोलिसांत गेला, असे साबू यांनी सांगितले. दरम्यान, एटीएसने मात्र सचिनला आम्ही अटक केली, असा दावा केला. 


एटीएसने सोडले, सीबीआयने घेरले 
सचिनला एटीएसने मंगळवारी ताब्यात घेतल्यावर गुरुवारी शहरात आणून सोडले. घरात जाताच त्याने मुलीला जवळ घेतले. अधिकाऱ्यांनी पत्नीला सांगितले की, चौकशी पूर्ण झाली आहे. हातपाय धुऊन सचिन जेवायला बसताच मागून सीबीआयचे अधिकारी घरात घुसले व कपडे साेबत घेऊन चलण्यासाठी सांगितले. या प्रकारामुळे सचिनसह सगळेच घाबरले. परंतु आमच्यासोबत चल, चौकशी करायची आहे, तुझ्या जिवाला धोका आहे, आमची गाडी बुलेटप्रूफ आहे, असे सांगून त्याने सचिनला अर्ध्या तासातच नेल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्याचे फेसबुक अकाऊंटही एटीएसने बंद केले आहे. 


दुकानमालक म्हणतात, सचिन प्रामाणिक, एकही तक्रार नाही 
निराला बाजार परिसरातील कापड विक्रेते दिलीप साबू यांच्याकडे मागील दहा वर्षांपासून सचिन अकाउंटंट म्हणून काम करत होता. त्यांच्या मुलाच्या उद्योगाच्या अकाउंटचेही तो काम पाहत होता. त्याला १६ हजार रुपये पगार होता. मागील दहा वर्षांत त्याची एकदाही तक्रार नाही. तो प्रामाणिक असून कोणालाही मदत करण्याचा त्याचा स्वभाव आहे. एका अनाथाश्रमाला तो महिन्याला आर्थिक मदत करत होता. या प्रकरणात त्याची अटक धक्कादायक आहे. सचिन असे करेल असे मला तरी वाटत नाही, पण येणारा काळच ठरवेल, असे दुकानमालक साबू म्हणाले. 


२० ऑगस्ट २०१३ ला सचिन शहरात असल्याच्या पुराव्याचा शोध सुरू 
२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. दाभोलकरांची हत्या झाली.अकाउंटचे काम करणारा सचिन रोज बँकेत पैसे भरण्यासाठी जायचा. स्लिपवर सहीही करायचा. त्यामुळे २० ऑगस्ट २०१३ रोजी तो शहरातच होता, असा काही पुरावा सापडतो का, याची चाचपणी त्याचे कुटुंबीय आणि मित्र करत आहेत. दुकानमालकही बँकेच्या स्लिपचा शोध घेत आहेत. ती सापडल्यास सचिनला मदत होऊ शकते. 


माझा पती निर्दोष : पत्नी शीतलचा दावा 
मंगळवारी सचिनला एटीएसने ताब्यात घेतल्याचे सायंकाळी आम्हाला कळले. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता त्यांनी आणून सोडले आणि अवघ्या काही मिनिटांतच सीबीआयने तपासाचा दबाव असल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन दाभोलकर हत्येत मुद्दामहून गोवले. सचिन कुणाचा खून करू शकत नाही. मागील अनेक वर्षांपासून तो शहराबाहेरही गेला नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...