आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचतीचे महत्त्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्रात एखादा सोयीचा दिवस पाहून गेली कित्येक वर्षे आम्ही नवरात्रोत्सवात कर्णपुरा देवीच्या यात्रेला नियमित जातो. प्रथम देवीचे दर्शन, नंतर जवळपासच्या इतर देवीदेवतांचे दर्शन; नंतर यात्रेतील दुकानांवर देवाच्या वस्त्रांची खरेदी हा पायंडा गेली कित्येक वर्षे सुरूआहे. मुले लहान होती तोवर तेथील गर्दीने फुललेल्या आनंदयात्रेत सहभाग ठरलेला असायचा. एक गोष्ट मात्र कधीही चुकली नाही ती म्हणजे छोट्या सुरईसारख्या आकाराच्या मातीने घडवलेल्या लाल रंगाच्या बचत बँकेची खरेदी.! मुलांना बालवयापासून बचतीचे महत्त्व समजायला हवे, शिवाय नियमित बचतीची सवय लागावी म्हणून सौभाग्यवतीचा प्रयत्न असे. प्रत्येक वर्षी नवी पिग्मी बँक घरी आणली की मग पैसे साठविण्यासाठी गतवर्षी आणलेल्या पिग्मी बँकेत वर्षभरात नेमके किती पैसे साठले असतील ह्याचे मुलांमध्ये कुतूहल दिसे.

आता मुले मोठी झाली असली तरी तितकीच उत्सुकता कायम आहे. घरी आल्यावर देवासमोर ती नारळासारखी फोडून सालाबादप्रमाणे हिशोब करायचा, मोजदाद करण्यासाठी लालबागच्या राजाच्या दरबारात जशी मंडळी बसतात तसे आम्ही घरातील सदस्य बसून चिल्लरचा खुर्दा, छोट्या-मोठ्या नोटा नीटनेटक्या जुळवून हिशोब करतो. त्यात भर टाकून दस-यानिमित्त काही खरेदी करण्यासाठी विनियोग करतो. डब्यात, पुस्तकात, साड्यांच्या घड्यांमध्ये अथवा अन्यत्र पैसे दडवून ठेवण्याचे दिवस आता राहिले नसले तरी आमचा हा उपक्रम अजून चालू आहे. नवीन पिढीतील तांत्रिक सुविधांच्या जमान्यात मुले आता इंटरनेट तसेच मोबाइल बँकिंग आणि प्लास्टिक मनी कार्डांच्या माध्यमातून व्यवहार करीत असले तरी मुळात बचतीची आवड मुलांमध्ये रुजविण्यासाठी ही पारंपरिक बचत पद्धत खूप परिणामकारक आहे असे वाटते. पैसे काढण्याच्या मोहावर आवर घालणारी, सहज उघडण्याची सोय नसलेल्या या बँकेतील बचतीवर, त्यातील बचती एवढाच परतावा मिळत असला तरी शेवटी त्यात साठलेले पैसे मोजताना मुलांच्या डोळ्यात दिसणारा आनंद हेच त्यावरील व्याज !