आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याचे महत्त्व उशिरा कळले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पस्तीस वर्षांपूर्वी आम्हा भावंडांकडून पाण्याचा नळ किंवा विजेचा दिवा अकारण चालू राहून गेलाच तर माझे वडील म्हणायचे,‘पाणी आणि वीज काही तुमच्या वडिलांची नाही. ती राष्‍ट्राची संपत्ती आहे.’ आमचे वडील पाण्याला आणि विजेला राष्‍ट्राची संपत्ती का म्हणतात तेच कळत नसे. नदीत तर पाहिजे तेवढे पाणी वाहून जाते, मग नळाचे थोडेसे पाणी वाहून गेले तर आपले वडील एवढे चिडतात का, असा प्रश्न आम्हा भावंडांना पडत असे. तीच गोष्ट विजेबाबतीत. राष्‍ट्रीय संपत्ती म्हणजे काय, हा आणखी गोंधळात टाकणारा विषय. ‘पाण्यासाठी युद्धे होतील’ याचा अर्थही आता कळतो आहे. विजेच्या बाबतीतही ग्रामीण भागात भारनियमन होते आहे. पाणी आणि वीज या जीवनावश्यक गरजांचा तुटवडा हा मानवनिर्मित चुकांमुळे घडला.

पाणी म्हणजे जीवन हे अर्थात कॉलेजला गेल्यावर समजले. आम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरे कॉलेजला गेल्यावर मिळाली, त्याच प्रश्नांनी आज किती गंभीर स्वरूप धारण केले आहे, याची जाणीव होऊन वडिलांची पर्यावरण संरक्षणाची पस्तीस वर्षांपूर्वीची तळमळ लक्षात येते आणि त्यांच्याविषयीचा आदर दुणावतो. ज्या काळी पर्यावरणाचे गांभीर्य फारसे कुणाच्या लक्षात आले नव्हते. त्या काळात वडिलांनी स्वत:च्या शिक्षकी पेशाचा आदर करीत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जागरूकता निर्माण केली. आज मात्र अभ्यासक्रमात दहा गाभाघटकांमध्ये व दहा मूल्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाचा समावेश करूनही अनेक शिक्षकांना त्याचे गांभीर्य समजले नाही, तेव्हा ते विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचणार? हा प्रश्न पडतो.